शिवणकलेच्या माध्यमातून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांना घडवत परिपूर्णतेकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सर्व गोष्टी अतिशय प्रेमाने शिकवणे

‘मला काही दिवस ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता करणे आणि त्यांचे कपडे शिवणे’ या सेवा मिळाल्या होत्या. तेव्हा मला त्यांची प्रीती अनुभवता आली. परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांची सेवा केली. तेव्हा त्यांनी ‘परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) मनोलय कसा करवून घेतला ?’, हे मी वाचले होते, उदा. दिवा लावला, तर ते त्यांना ‘दिवा का लावला ?’, असे विचारायचे आणि दिवा लावला नाही, तर ‘दिवा का लावला नाही ?’, असे विचारायचे. वेळेत औषध दिले, तर ‘मी घेतो’, असे म्हणायचे आणि औषध दिले नाही, तरी रागवायचे. परात्पर गुरुदेवांनी मात्र सर्व साधकांना फार प्रेमाने शिकवले.

सौ. पार्वती जनार्दन

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कपड्यांचे व्यवस्थापन शिकून घेण्यास सांगणे

आतापर्यंत मी परात्पर गुरुदेवांचे कपडे शिवण्याच्या संदर्भात विचार करत होते. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘केवळ शिवण नाही, तर कापड घेतांना त्याचा अभ्यास करणे, त्या कापडाचा योग्य ठिकाणी वापर करणे, शिवलेल्या कपड्यांचेही वर्गीकरण करून त्यांना ‘लेबल’ लावणे, उदा. चित्रीकरणाच्या वेळी घालायचा सदरा, झोपतांना घालायची बंडी इत्यादी. असे सर्व करणे, म्हणजे एक प्रकारचे व्यवस्थापन आहे. तेही तू शिकून घे.’’

२ अ. साधिकेकडून चुकीचे ‘लेबल’ लावल्यावर ‘त्याचा अर्थ चुकत आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून देऊन ‘योग्य ‘लेबल’ कसे लिहायला हवे ?’, ते सांगणे : एकदा आम्हाला (मी आणि कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या कपड्यांचे वर्गीकरण करायला सांगितले. ते म्हणाले, ‘‘बंडी, पायजमा आणि सदरे यांच्या स्थितीनुसार ‘कार्यक्रमाला जातांना घालणे, खोलीत वापरणे, झोपतांना घालणे, सुधारणा करण्यासाठी द्यायचे कपडे’, असे वर्गीकरण करून त्यांना ‘लेबल’ लावा.’’ ती सेवा करतांना आम्ही ‘नवीन घरी घालण्यासाठी बंडी’, असे ‘लेबल’ केले. ते ‘लेबल’ वाचून परात्पर गुरुदेव आम्हाला म्हणाले, ‘‘नवीन घरी घालण्यासाठी बंडी’, असे ‘लेबल’ लावले आहे. आता मी कुठल्या नवीन घरी जाणार ? मी ती वापरायची नाही का ?’’ तेव्हा ‘आम्ही लिहिलेले ‘लेबल’ चुकीचे आहे’, हे आमच्या लक्षात आले. कुणीही ‘लेबल’ पाहिले, तरी त्यांना पटकन समजेल, असे ‘लेबल’ लिहिणे त्यांना अपेक्षित होते. नंतर त्यांनी त्या ‘लेबल’मध्ये सुधारणा करून ‘घरी घालण्यासाठी नवीन बंडी’ असे ‘लेबल’वर लिहायला सांगितले.

२ आ. सदरा कपाटात ठेवायला दिल्यावर ‘तो कुठे ठेवायचा ?’ आणि ‘त्या सदर्‍याच्या पिशवीला कुठले ‘लेबल’ लावायला हवे ?’, हेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून देणे : आम्ही वर्गीकरण करून कपडे कपाटांत ठेवतांना कपडे ठेवायच्या खणाला आणि त्या पिशवीलाही ‘लेबल’ लावत होतो. एकदा एक सदरा परात्पर गुरुदेवांनी घालून बघून ‘मापाला बरोबर आहे’, असे सांगून कपाटात ठेवायला दिला. त्यांनी सांगितल्यावर कल्याणीताईने त्या पिशवीला ‘लेबल’ न लावता ती तशीच कपाटात ठेवली. थोड्या वेळात ते परत आले आणि तिला म्हणाले, ‘सदर्‍याची पिशवी ‘लेबल’ न लावता कपाटात का ठेवली ?’ त्यानंतर ताईने त्या पिशवीला ‘लेबल’ लावून ठेवले.

२ इ. साधिकांचा मनोलय करण्यासाठी पुनःपुन्हा सुधारणा सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हे रूप प्रथमच अनुभवणे : त्यांचे कपडे फार अधिक होते, असे नव्हते; पण वर्गीकरण करून ठेवल्यावर ते थोड्या वेळाने पुन्हा त्यात सुधारणा सांगायचे. त्यांनी ३ – ४ वेळा येऊन त्यात सुधारणा सांगितल्या. एरव्ही त्यांचे प्रीतीमय रूप पहाण्याची मला सवय होती. या पूर्वी त्यांचे असे वारंवार चुका किंवा सुधारणा सांगणारे रूप मी कधी पाहिले नव्हते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य साधिकांना सहन न होणे

एक दिवस आम्हा दोघींना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य सहन होत नव्हते. त्यामुळे आम्हाला सेवा पूर्ण करायला फार वेळ लागला. साधारण २.३० घंटे आम्ही सेवा केली. एरव्ही अल्पाहार किंवा जेवण यांची वेळ झाल्यावर आम्ही सेवा करत असू, तर ते आम्हाला अल्पाहार किंवा जेवायला पाठवतात; पण आज अल्पाहाराची वेळ झाल्यावरही ते आम्हाला काही बोलले नाहीत. सेवा संपल्यानंतर आम्ही त्यांच्या खोलीतून जातांना त्यांनी आम्हाला अल्पाहार करण्याची आठवण करून दिली.

त्या दिवशी त्यांनी आमची परीक्षा घेऊन आमचा मनोलय करवून घेतला आणि शिष्यांना परिपूर्णतेकडे जाण्यास शिकवले.’

– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे) (२१.५.२०२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिवणामध्ये अधिक सात्त्विकता येण्यासाठी शिकवलेली सूत्रे !

शिवणकामाची सेवा भावपूर्ण करतांना सौ. पार्वती जनार्दन

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘कशा प्रकारे कापड कापले, तर ते अधिक चांगले होईल ?’ हे शिकवणे, त्याप्रमाणे प्रयत्न करत गेल्यावर त्यांना अपेक्षित अशी बंडी शिवून होणे

‘आम्ही आधी परात्पर गुरु डॉक्टरांच्या वापरातील जुन्या कपड्यांवर प्रयोग करत होतो. हे कपडे अगोदरच कापून शिवले असल्याने त्यात अपेक्षित अशा सुधारणा करता येत नव्हत्या. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये गुरुदेवांनी अल्प दर्जाचे किंवा जुने कापड घेऊन ते कापून त्यात कपडे शिवून त्याचा अभ्यास करण्यास सांगितले. ‘कशा प्रकारे कापल्यावर ते चांगले होईल ?’, हेही परात्पर गुरुदेवांनी शिकवले. त्याप्रमाणे मी कागदावर खुणा करून कापून घेतले. नंतर बंडीसाठी २ – ३ प्रकारची जुनी कापडे आणून ती गुरुदेवांना दाखवली. गुरुदेवांनी त्यातील एक कापड निवडले. हे कापड काही दिवस श्रीकृष्णाच्या चित्राखाली घातले होते. प.पू. गुरुदेवांनी निवडल्यानंतर कापड हातात घेतल्यावर मला चांगली स्पंदने जाणवली. काही दिवसांनी त्या कापडामध्ये अल्प सुरकुत्या असलेली आणि परात्पर गुरुदेवांना अपेक्षित एक बंडी शिवून पूर्ण झाली. बंडी शिवण्याचा प्रयोग पूर्ण झाला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी बंडी शिवून झाल्यावर केलेला सूक्ष्मातील प्रयोग !

त्यानंतर त्यांनी ते वापरत असलेली त्यांची दुसरी बंडी मला सुधारणा करण्यासाठी दिली. त्या वेळी मी शिवलेली जुन्या कापडाची बंडी (क्र. १) आणि ते वापरत असलेली सुधारणा करण्यासाठी दिलेली बंडी (क्र. २), दोन्ही हातांत घेऊन ‘त्यांची स्पंदने कशी जाणवतात ?’, याचा मला अभ्यास करायला सांगितला.

२ अ. बंडी क्र. १ : ही बंडी हातात घेतल्यावर मला पुष्कळ हलकेपणा वाटला. आतून थंडावा जाणवला. मन शांत होऊन आनंद जाणवला.

२ आ. बंडी क्र. २ : ही हातात घेतल्यावर जडपणा जाणवला आणि डोके दुखले. याचे कारण काय ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले : कारण तिच्यात मुळातच सुधारता न येणार्‍या दुरुस्त्या होत्या.

मी हा प्रयोग करत असतांना मी सेवा करत असलेल्या ठिकाणी पू. राधा प्रभुआजी आल्या. त्यांनीही तो प्रयोग करून बघितला. त्यांनाही वरीलप्रमाणेच स्पंदने जाणवली. तेव्हा ‘माझी प्रयोगाची उत्तरे योग्य आहेत’, असे मला वाटले.’

– सौ. पार्वती जनार्दन

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक