।। श्रीकृष्णाय नम: ।।
काही जणांना प्रश्न पडतो की ते पूजा, जप इत्यादी अनेक वर्षांपासून करत आहेत, तरी त्यांचे अष्टसात्विक भावांपैकी कोणतेच भाव का जागृत होत नाहीत ?
अष्टसात्विक भाव – स्वेद: स्तंभोऽथ रोमाञ्च: स्वरभङ्गोऽथ वेपथु: ।
वैवर्णमश्रुप्रलय इत्यष्टौ सात्विका मता: ।। भरत: ।।
अर्थ – स्वेद (घाम), स्तंभ (जडत्व), रोमांच, स्वरभंग, कंप, वैवर्ण्य (मुख पांढरेफटक पडणे), अश्रू आणि मूर्च्छा हे अष्टसात्विक भाव मानले आहेत.
आता अष्टसात्विक भाव का जागृत होत नाहीत, ते पाहू.
भक्तांना ईश्वरप्राप्ती तर हवी असते, परंतु जगातल्या सुखांना सोडायला ते सिद्ध नसतात. हे ही हवे आणि ते ही हवे, असे होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण संसार-व्यवहारातील सुख हवे आहे तोपर्यंत मन पूर्णपणे ईश्वरात लागू शकत नाही. केवळ ईश्वरप्राप्तीचाच ध्यास नसेल, संसारातील सुखसुद्धा हवे असेल, तर मन सात्विक झालेच कुठे? मग अष्टसात्विक भाव कसे जागृत होतील? भक्तीची उत्कटता अपुरी असल्याने असे होते. ईश्वराविना भक्त विव्हळ झाला, तडफडायला लागला, दुसरे काही सुचेनासे झाले की अष्टसात्विक भावाची लक्षणे प्रकट होऊ शकतात. काही प्रगत भक्तांची केवळ भगवंताच्या स्मरणानेसुद्धा भावजागृती होते.
ह्या विषयावर आणखी काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. –
१. साधनेच्या अनेक मार्गांपैकी केवळ भक्तीमार्गाने साधना करणार्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होऊ शकतात, कारण केवळ भक्तीमार्गातच मनाच्या भावांना महत्त्व असते. इतर साधना मनाच्या भावांवर आधारित नाहीत.
२. भक्तीसह आत्मज्ञानसुद्धा असणार्यांची भावजागृती सहसा होत नाही.
३. जोपर्यंत ईश्वराप्रती भाव आहे, ईश्वराला स्वत:पेक्षा वेगळा मानत असेल तोपर्यंत भक्त सदा द्वैतात राहील, ईश्वराशी एकरूप होणार नाही.
४. अष्टसात्विक भाव जागृत न होणे, जागृत होणे आणि भाव शांत होणे, ह्या तीन अवस्थांपैकी भाव जागृत होणे ही मधली अवस्था आहे; ही साधक अवस्था आहे, सिद्धावस्था नाही. साधना परिपक्व झाली की अश्रू, रोमांच, स्वरभंग इत्यादी विकाररहित होऊन भक्त शांत होतो.
– अनंत आठवले. ६.४.२०२३
।। श्रीकृष्णापर्णमस्तु ।।
पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजीलेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. |