स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…

२५ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘अनेक राष्ट्रपुरुषांमध्ये केवळ सावरकरांच्या शिरपेचातच ‘स्वातंत्र्यवीर’ बहुमान, मातृभूमीसाठी आयुष्यभर कष्ट, अपमान आणि उपेक्षा सहन करणारे सावरकर अन् कोणत्याही विरोधाला योग्याप्रमाणे सामोरे जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ‘पसायदानाचे अधिकारी’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग येथे देत आहोत.

प्रा. श्याम देशपांडे

५. आयुष्यभर भारतमातेची भक्ती आणि साधना करणारे कर्मयोगी सावरकर !

सावरकर यांनी मागितलेल्या पसायदानाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी ते त्या अधिकाराचे ठरतात कि नाही ? याचे चिंतन आपण पहात आहोत. आध्यात्मिक प्रयत्नांच्या प्रांतामध्ये सामान्य मनुष्याची धडपड आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी असते. व्रत, वैकल्ये, उपासना, जप, तप, तीर्थ, ध्यान आदी सर्वांमागे सुखप्राप्ती ही भावना असली, तरी त्याच्या टोकाशी आत्मानंदाची अनुभूती घेणे, ही सुप्त भावना असते. त्याच्या ठायी स्वार्थ आणि विषयसुख यांचा त्याग करण्याची सिद्धता वा सामर्थ्य नसल्याने इच्छा असूनही त्याचा तो प्रवास होत नाही. परिणामी त्याची रहस्य जाणण्याची जी इच्छा असते, ते त्याला अवगत होत नाही. सावरकर जन्मजातच सिद्ध योगी असल्याने आणि त्याची जाण असल्याने त्यांना जगरहाटीचे रहस्य जाणण्यासाठी आध्यात्मिक साधनांची काथ्याकुट करावी लागली नाही. ‘त्यातून आपुले कुल ईश्वरांशी’ किंवा ‘कि रामसेवा पुण्यलेश आपुल्या भाग्यी लाभली’, असे म्हणणारे सावरकर ‘आम्ही वैकुंठवासी’ म्हणणार्‍या संत तुकोबांच्या जातकुळीचेच ठरतात. जीवनाचे कल्याण कशात आहे, याची जाणीव त्यांना अगदी बालवयात झाली. आत्मप्रचीतीच्या अनुभूतीमुळेच बालवयापासून त्यांच्या ठायी प्रतिभेचे अंकुर उमलून त्यांच्या साहित्याला विवेक आणि विचार यांचे एक निश्चित अधिष्ठान असल्याचे दिसून येते.

रहस्य जाणण्यासाठी मंथन करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. त्यांच्या साहित्यातून प्रस्थापित झालेले सिद्धांत हे केवळ भारतासाठी नाही, तर जगातील कोणत्याही राष्ट्रासाठी ‘यावत्चंद्र दिवाकरो’ लागू पडतील, असे आहेत. संतांनी विशिष्ट देवतेला साक्षी ठेवून सर्व आध्यात्मिक प्रवास केला. सावरकर यांनी त्यांच्या अंतःकरणाच्या देव्हार्‍यात ‘भारतमाता हीच देवता’ विराजमान केली. त्याची भक्ती आणि साधना केली. सारा कर्मयोग तिच्या चरणी समर्पित केला आणि या साधनेत त्यांनी कोणतीही तडजोड कधीच स्वीकारली नाही. तडजोड स्वीकारण्याचा संबंध हा स्वार्थाशी असतो. जिथे निःस्वार्थ भाव आहे, तेथे तडजोडीचे अस्तित्वच अशक्य आहे. त्यामुळे संत आणि योगी यांचा प्रवास ज्या स्वरूपाच्या साक्षात्कारासाठी असतो, तोच प्रवास सावरकर यांनी भारतमातेच्या साक्षात्कारासाठी आयुष्यभर केलेला आहे. त्यामुळे मातृभूमीच्या कल्याणासाठी काय उपयुक्त आणि अनुपयुक्त याचे स्वच्छ अन् स्पष्ट दर्शन त्यांना होत होते. त्यामुळेच निर्भयतेने त्यांनी मातेच्या कल्याणासाठी सर्व शब्दसंपदा साधन म्हणून निरपेक्ष भावाने उपयोगात आणली. परिणामी सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले साहित्य हे राष्ट्रभक्तासाठी संतांच्या वाङ्मयाइतके चिरंतन, प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरले. निर्भयता धारण केलेला भक्तच शाश्वत सिद्धांताचा अधिकारी असतो. व्यक्तीला अधिकांश भय हे मृत्यू आणि दुःख यांचे असते; कारण त्याच्या ठायी देहभाव असतो; पण जेव्हा देहातीत अवस्था प्राप्त होऊन तो ब्रह्मानंदी विराजमान झालेला असतो, तेव्हा भय त्याच्या वार्‍यालाही उभे रहात नाही. त्यामुळे ते सत्य तो निर्भयपणे जगासमोर ठेवतो. सावरकरी साहित्य राष्ट्रभक्तीच्या प्रांगणात निर्भयपणाचा खजिना आहे. राष्ट्रभक्तीचा हा अमृतरस त्यांनी जनसामान्यांना निःस्वार्थी भावाने मुक्तपणाने वाटला. तसेच त्यांनी अशी भक्ती प्रत्येक राष्ट्रपुरुष आणि नागरिक यांच्यामध्ये निर्माण व्हावी, अशी मागणी भारतमातेच्या चरणी केली.

६. काळाच्या ओघातही चिरकाल टिकणारे सावरकर यांचे वाङ्मय !

मानवी आयुष्य हा देण्या-घेण्याचा व्यापार आहे; परंतु जिथे घेणे, हा भाग उरलाच नाही, तेथे केवळ देणेच उरते. आज वर्तमानात राष्ट्राचा चाललेला अधिकांश व्यवहार हा सावरकर यांच्या राष्ट्रविषयक सिद्धांतालाच अनुलक्षून होतांना दिसतो; परंतु कुपमंडूक स्वार्थी वृत्ती किंवा राष्ट्रभक्ताप्रती पूर्वग्रहदूषित अंतःकरणातील द्वेषयुक्त संस्कार यांमुळे त्यांच्या नावाचा उल्लेख होतांना दिसत नसला, तरी अभ्यासक, चिंतक आणि राष्ट्रभक्त यांना तो जाणवल्याविना रहात नाही. हे चिंतन त्याच राष्ट्रपुरुषांच्या तपश्चर्येतून प्रकट होऊ शकते, जो राष्ट्रपुरुष मध्यमा आणि पश्यंती यांच्या पलीकडे जाऊन परावाणीचे सामर्थ्य आपल्या अंगी बाणून असतो. सावरकर परावाणीच्या प्रातांत वावरणारे सिद्ध योगी राष्ट्रपुरुष होते. त्यामुळे त्यांनी सामान्य स्थितीतील देण्या-घेण्याच्या व्यवहारापासून अधिक उंच उठून राष्ट्राला वेळोवेळी परिस्थिती अनुरूप मार्गदर्शन केले. ते इतके सामर्थ्यशाली आहे की, कोणताही काळ ते पुसून टाकण्यास समर्थ नाही. शब्दब्रह्माचे हे सामर्थ्य त्यांच्या वाङ्मयात पानोपानी ठासून भरले आहे. त्यामुळेच त्यांची काव्यसरिता मातृभूमीच्या भक्तीने वीररसात न्हाऊन निघत प्रासादिकाचे वस्त्र परिधान करून शब्दालंकाराने नटलेली आहे.

७. ‘ने मजसी ने, सागरा प्राण तळमळला’ हे काव्य नव्हे, तर राष्ट्रभक्ताच्या अंतःकरणातून साकारलेले करुणाष्टक !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्तीच्या प्रांतात छत्रपती शिवरायांनंतर जगद्गुरु ठरावेत, अशा योग्यतेचे आहेत. जगद्गुरु हा शुद्ध ज्ञान, निष्काम बुद्धी, आत्मनिश्चयात्मक समाधान आणि वैराग्य यांनी ओतप्रोत ओथंबलेला असतो. आपले सर्व कुळ ‘निर्वंश’ करावयास निघालेला मातृभूमीचा हा भक्त संपूर्ण आयुष्यात काहीही लौकिक मिळाले नसतांनाही ‘वरम् जनहितम् ध्येय, केवला न् जनस्तुती’ या सूत्राने इतका समाधानी होता की, आत्यंतिक पिडा आणि मानहानी देणार्‍यांप्रतीही त्याने कधीच शापवाणीचा विचार केला नाही. मातृभूमीच्या कल्याणासाठी ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना. आमचे ध्येय आम्ही मिळवणारच’, असे म्हणत आपला ध्येयप्रवास त्यांनी अखंड चालूच ठेवला. तारुण्यात सार्‍या सुखावर निखारे ठेवून अंदमानचा कठीण कारावास पचवणारा आणि कष्टांची तमा न बाळगता ३ खंडकाव्ये आणि १०० हून अधिक स्फूट काव्य यांची निर्मिती करणारा हा मृत्युंजय महायोगी विरक्ती आणि वैराग्य यांचा मूर्तीमंत नमुना आहे. त्याग, विरक्ती, वैराग्य, निस्सीम भक्तीभाव आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची क्षमता या गोष्टी वर्तमानात स्वामी विवेकानंदांच्या नंतर केवळ सावरकरांच्या ठायीच दिसून येतात. किमान विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसासारखे सद्गुरु तरी लाभले होते; परंतु सावरकरांची साधना ही एकलव्याची साधना होती. मातृभूमीच्या प्रतिकांशी निस्सीम श्रद्धाभाव राखून या राष्ट्रभक्ताने राष्ट्रभक्तीचे रसायन जगाला दिले. ते देतांना एका मर्यादेपर्यंत छत्रपती शिवरायांविना अन्य कोणताही मार्गदर्शक दीपस्तंभ त्यांच्यासमोर नसल्यामुळे सावरकरांचे गुरु सावरकरच ठरतात. व्यक्तीची श्रद्धा त्यांच्या आराध्याविषयी जितकी उत्कट अन् मंगल असते, तितका त्याचा आत्मानुभव हा उत्कट आणि समर्थ असतो. सावरकरांची भारतमातेप्रती असणारी श्रद्धा निष्कलंक होती. त्यामुळे त्यांना प्राप्त होणारा आत्मानुभव हा राष्ट्रकल्याणाचे सुक्त होय. सावरकर स्वतःचे गुरु होऊन भारतमातेच्या चिंतनात इतके खोलवर पोचले की, तिच्या कल्याणासाठी पसायदान मागण्याचा अधिकार त्यांना अंतर्मनातून सहज प्राप्त झाला. तो अधिकार हा त्यांना मातृभूमीने दिलेला कृपाप्रसाद होय ! त्यांनी भारतमातेची भक्ती अत्यंत मनोभावे केली. भक्तीच्या प्रांतात आपल्या देवतेच्या केवळ चिंतनानेही भक्ताचे केवळ अंत:करणच नव्हे, तर संपूर्ण शरीर हलून जाते आणि विरहाचा तो गहिवर रोमारोमातून प्रकट होऊ लागतो. या अवस्थेला सावरकर ऐन तारुण्यात पोचले होते. या गहिवराचे प्रकटीकरण ‘ने मजसी ने, सागरा प्राण तळमळला’ या अमर साहित्य शारदेच्या कंठातील मौक्तिक पदाप्रमाणे शोभणार्‍या कलाकृतीतून स्वाभाविकपणे प्रकट झाले. त्यांची ही रचना केवळ काव्य नव्हे, तर मातृभूमीच्या भक्ताच्या अंतःकरणातून साकारलेले करुणाष्टक आहे.

करूण भावात चिंब भिजून बाहेर पडणारा त्यांचा प्रत्येक शब्द मातृभूमीच्या विरहाने नेत्रातून गळणार्‍या प्रत्येक अश्रूंच्या अभिषेकाने पवित्र होऊन प्रकट होत गेला होता. याची साक्ष निरंजन पॉल या देशभक्ताने दिली आहे. त्यामुळेच ही कलाकृती स्वतंत्रतेच्या स्तोत्रासारखी अमर कलाकृती आहे. अशी एक नव्हे, तर स्वातंत्र्य आणि भारतमाता यांची गाथा या राष्ट्र्रभक्ताच्या चिंतनातून प्रकट झाली. त्यामुळे सावरकरी काव्य हे स्वातंत्र्याची अजरामर अशी गीताच ठरली आहे. ज्याच्या ठायी ज्ञानजन्य निरहंकार क्षणोक्षणी नांदत असतो, त्यांच्याकडूनच असे चिरंतन प्रकटीकरण होऊ शकते. जेव्हा भक्त आपले मन, चित्त, बुद्धी आणि बोध यांच्या चौरंगावर केवळ एकाच आराध्याची प्रतिष्ठापना करत त्याच्याच ध्यासात सदैव विहार करत असतो, तेव्हाच वेद आणि उपनिषद यांसारखी ही सुक्ते भक्ताच्या मुखातून आणि त्याच्या करकमलातून साकार होत असतात.

– प्रा. श्याम देशपांडे, वर्धा

(क्रमशः उद्याच्या अंकात)