ज्यांची प्रत्येक कृती आणि उक्ती यांतून केवळ राष्ट्रभक्तीचाच सुगंध प्रकट झाला, ते स्वातंत्र्यवीर सावरकर पसायदानाचे अधिकारी ठरतात !
सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…
१. अनेक राष्ट्रपुरुषांमध्ये केवळ सावरकरांच्या शिरपेचातच ‘स्वातंत्र्यवीर’ बहुमान !
‘आत्यंतिक छळ, उपेक्षा, निंदा आणि संन्यासाची पोरे म्हणून सातत्याने होणारी अवहेलना अंतःकरणात कुठेही साठवून न ठेवता महाराष्ट्राचे संतशिरोमणी ज्ञानोबारायांनी सकल विश्वासाठी त्यांचे गुरु निवृत्तीनाथांकडे पसायदानरूपी आशीर्वाद मागितला. मानवी देहात राहून अंतःकरणाची ही भव्यदिव्यता अन् व्यापकता क्वचित्च जगाच्या पाठीवर कुठे पहावयास मिळेल आणि म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया ‘सारस्वतकार’ म्हणून वंदनीय ठरले. ‘पसायदान’ हा शब्द कर्णरंध्रावर आदळला की, मनात संत ज्ञानोबारायांची प्रतिमा उभी रहाते. वास्तविक संत ज्ञानोबाराय यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जात आणि संप्रदाय यांच्या भिंती ओलांडून संताची मांदियाळी गावोगावी उदयास आली. ज्यांची कीर्तीपताका आजही पंढरीच्या वाळवंटात मोठ्या भक्तीभावाने डोलत आहे. संत तुकोबा, संत नामदेव महाराज, संत सावता माळी, संत नरहरि, संत एकनाथ महाराज आदींनीही त्यांच्या भक्तीभावातून उत्पन्न झालेल्या शब्ददेवतेच्या चरणी अंती पसायदान मागितलेच आहे, तरीही पसायदानाचा मान संत ज्ञानोबा माऊलींनाच मिळतो. अशा प्रकारे भारताच्या इतिहासात मातृभूमीची परवशता दूर व्हावी; म्हणून यथाशक्ती आणि यथामती अनेक राष्ट्रभक्तांनी त्यांची सेवा मातृभूमीच्या चरणी समर्पित केली. प्रत्येकाचे मार्ग, साधने आणि चिंतन भिन्न असले, तरी त्यांचा उद्देश एकच होता, यात दुमत नाही; पण ‘स्वातंत्र्यवीर’ हा सन्मान आणि शिरपेच ज्यांच्या शिरावर राष्ट्राने चढवला, ते एकमेव विनायक दामोदर सावरकरच होय !
२. मातृभूमीसाठी आयुष्यभर कष्ट, अपमान आणि उपेक्षा सहन करणारे सावरकर !
‘विनायक दामोदर सावरकर’ हा शब्द मनात उमटताच तात्काळ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ अशीच प्रतिक्रिया प्रगट होते. याचे कारण समाज आणि व्यक्ती यांच्या कल्याणासाठी संत ज्ञानोबारायांनी सर्व प्रतिकूलतेचे विष पचवून लोकांना केवळ अमृतच दिले. त्याप्रमाणे विनायक सावरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही मृत्यूच्या क्षणापर्यंत सारे कष्ट, अपमान अन् उपेक्षा अनुभवली; पण आपल्या ध्येयवादात आणि भक्तीभावात त्याचे कुठेही प्रतिध्वनी उमटू न देता भारतमातेच्या अभ्युदयासाठी राष्ट्राला केवळ मातृभूमीचेच चिंतन दिले. सर्व राष्ट्रभक्तांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर’ ते एकमेव ठरले. संत ज्ञानोबारायांनी जसे विश्वकल्याणासाठी पसायदानाचे दान आपल्या भक्तीझोळीत अपेक्षिले, तसेच स्वातंत्र्यविरांनीही या अवताराचा समारोप भारतमातेच्या चिंतनात मातृभूमीच्या अखंडत्वाच्या पसायदानात केला.
‘पसायदान’ हा मराठी मातीचा पवित्र सुगंध आहे. ज्या वेळी एखादा भक्त शब्दसुमनाने सतत साहित्यशारदेच्या यज्ञवेदीत त्याची रचना आहुतीच्या रूपाने समर्पित करत जीवनाच्या सांगतेकडे जातो, तेव्हा त्या यज्ञाची पूर्णाहुती, म्हणजे पसायदान होय; कारण पसायदान हा कृपाप्रसाद असतो. ते त्यांनी केलेली साधना आणि तपश्चर्या यांचे फलित असते. त्यांच्या साधनेने त्यांचा अधिकार इतक्या उंचीला पोचतो की, त्याची सिद्धता पसायदानाच्या रूपाने प्रकट होते. हा अधिकार प्रत्येक साधकाला नसतो. ती सिद्धता त्या साधकाच्या ठायी निर्माण व्हावी लागते. तेव्हाच त्याच्या अंतर्मनातून हे पसायदानाचे अमृत बाहेर पडते. त्यामुळेच संत नामदेव महाराज, संत तुकोबाराय, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी हे सारे सिद्ध योगी जसे पसायदानाचे अधिकारी ठरले, तसेच मातृभूमीच्या भक्तीत ज्यांची प्रत्येक कृती आणि उक्ती यांतून केवळ अन् केवळ राष्ट्रभक्तीचाच सुगंध प्रकट झाला, ते स्वातंत्र्यवीरही पसायदानाचे अधिकारी ठरतात.
३. स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीमध्ये सर्व भौतिक सुखांची आहुती देणार्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पण अतुलनीय !
छत्रपती शिवरायांच्या काळात अन्याय, अत्याचार, आसुरी बलात्कार यांपासून पीडित भूमीला मुक्त होण्यासाठी समर्थ रामदासांनी ‘कल्याणकारी देवराया’ हे पसायदान मागितले. त्याप्रमाणे ब्रिटिशांच्या पाशवी बलात्काराने कासावीस झालेल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी तळमळणार्या स्वातंत्र्यविरांनीही त्यांचे कुलदैवत आई भवानीकडे मागणे मागितले. बालवयात घेतलेली प्रतिज्ञा ही त्यांच्या तळमळणार्या अंतःकरणाचे प्रकटीकरणच होते. त्या प्रतिज्ञेच्या संकल्पाप्रमाणे परिस्थितीला अनुलक्षून साधनेच्या आधारावर स्वातंत्र्यप्राप्तीचे स्फुल्लिंग चेतवून त्यात एका मागोमाग एक सार्या भौतिक सुखाच्या आहुत्या दिल्या. सावरकर हातचे काहीही राखून न ठेवता सर्वस्व समर्पणाच्या निःस्वार्थी भावनेने जेव्हा क्षणोक्षणी प्रकट होतांना दिसतात आणि त्या प्रकटीकरणाचा परिणाम ‘याचि देही याचि डोळा’ राष्ट्र स्वतंत्र झाल्याचा भाग्यकाळ त्यांच्या जीवनात निर्माण होतो. त्या वेळी होणारा आनंद हा समर्थांच्या आनंदवनभुवनापेक्षा अंशमात्र न्यून नाही; पण त्या आनंदाला दुःखाची असलेली एक किनार जी त्यांना सतत सलत होती. त्याच्या निवारणार्थ त्यांनी मागितले पसायदान !
४. कोणत्याही विरोधाला योग्याप्रमाणे सामोरे जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ‘पसायदानाचे अधिकारी’ !
‘पसाय’ म्हणजे प्रसाद. त्यामुळे पसायदान हा कृपाप्रसाद होय. जेव्हा या प्रसादाला ईश्वरीकृपेचा स्पर्श होतो, तेव्हा हा कृपाप्रसाद पसायदान ठरतो. जेव्हा हा प्रसाद एखादी व्यक्ती ईश्वराकडे मागते, तेव्हा त्यात तिचा वैयक्तिक स्वार्थ कुठेही नसतो. असतो तो केवळ जगत् कल्याणाचाच विचार ! स्वातंत्र्यविरांनीही मागितलेल्या पसायदानात केवळ भारतमातेच्या कल्याणाचाच विचार केला आहे. त्यात वैयक्तिक लाभाचा लवलेशही नाही, असे मागणे केवळ संत, ऋषी, थोर महात्मे आणि अवतारी पुरुष यांचेच राहू शकते; कारण त्यात दिव्य, उदात्त, मंगलदायी अशी भावना असते. अशा मागण्यात आकाशाची व्यापकता, सागराची सखोलता आणि गिरिशिखराची भव्यता असते. साधक संपूर्ण आयुष्य एका ध्येयवादाने प्रेरित होऊन तपश्चर्येच्या भूमिकेत व्यतित करत असतो, तेव्हा त्या साधनेच्या तपाची सांगता ही पसायदान असते.
सावरकर यांनी बालवयापासून ते अंतिम श्वासापर्यंत त्यांच्या साहित्याचा जो यज्ञ पेटवला, त्या साहित्य तपश्चर्येच्या यज्ञाची सांगता, म्हणजे त्यांचे पसायदान होय. पसायदान मागणारी व्यक्ती निर्मळ मन, निष्कलंक चरित्र्य, निरपेक्ष भाव आणि निर्दोष विचार यांची असावी लागते. संपूर्ण आयुष्यात स्वजन, तसेच परकीय यांनी सावरकर यांना प्रचंड मानहानी, उपेक्षा, अपरिमित शारीरिक कष्ट आणि पीडा दिल्या. नियतीनेही बालवयातच मातृ-पितृछत्र हिरावण्यापासून ते जगण्याच्या साधनांच्या उणिवांपर्यंत प्रचंड आक्रमण केले; पण आयुष्याच्या अंती ‘धन्योऽहम्, धन्योऽहम्’ म्हणत परिस्थितीवर आक्षेप न घेता ‘जे झाले तो प्रारब्धाचा भाग’, असे म्हणून ‘गंगार्पण’ या भावाने सारे विसर्जित करत ज्या प्रकारे त्यांनी योग्याच्या भूमिकेतून शरिराचा त्याग केला, ते पहाता सावरकर ‘पसायदानाचे अधिकारी’ कसे ठरतात, याची साक्ष पटते. जी व्यक्ती अंतःकरणाने विशाल असते, तीच नम्र असते. अशी विनयशील व्यक्ती जगापासून दूर जाण्याच्या भावातील असते; कारण मनुष्य जितका लहान तितका तो जगरहाटीत गुरफटलेला आणि जितका तो मोठा तितका तो जगापासून दूर असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात सावरकर यांनी अलिप्तता धारण केली होती. इतकेच काय; पण अनेक विषयांवर त्यांनी भाष्य करणेही बंद केले होते. याचे कारण मनुष्याचा मोठेपणा आणि मनुष्याची संकुचितता ही त्याच्या अहंकारयुक्त भावात असते. अहंकारी व्यक्ती ही कोषात वावरणारी असते आणि अहंकारविरहित माणूस अतीनम्र झाल्याने सकलांच्या प्रती प्रेमभाव राखून विषम भावापासून दूर गेलेला असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व वंदनीयच ठरतात. सावरकर यांच्या ठायी हा भाव मुरला होता.
वैचारिक मतभेद असतांनाही नामदार गोखले, म. गांधी, काँग्रेसची मंडळी इतकेच काय; पण अंदमानमध्ये त्यांचा आत्यंतिक छळ करणारा बारी यांच्या प्रतीही त्यांनी त्यांच्या साहित्यातून जो श्रद्धाभाव प्रकट केला, तो पहाता त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे मोजमाप करण्याचे साधनही आपल्याला उपलब्ध होत नाही. ‘योग्याची लक्षणे त्यांच्या ठायी पदोपदी दिसतात; म्हणूनच ते पसायदानाचे अधिकारी ठरतात.’
– प्रा. श्याम देशपांडे, वर्धा (क्रमशः उद्याच्या अंकात)