जैवविविधता नोंदणी पुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी या राष्ट्रीय मोहिमेचा गोव्यात प्रारंभ

पणजी २३ मे (पसूका) – जनतेच्या जैवविविधता नोंदणी (पीबीआर – पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) पुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी यांसाठी २३ मे या दिवशी गोव्यात राष्ट्रीय मोहीम चालू करण्यात आली. गोवा राज्य जैवविविधता मंडळ, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आणि गोवा सरकार यांच्या सहकार्याने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे पर्यावरण आणि हवामान पालट मंत्री नीलेश काब्राल; राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. अचलेंदर रेड्डी आणि इतर वरिष्ठ सरकारी प्रतिनिधी

यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे पर्यावरण आणि हवामान पालट मंत्री नीलेश काब्राल; राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. अचलेंदर रेड्डी आणि इतर वरिष्ठ सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले, ‘‘निसर्गातील नाजूक समतोल राखणे  महत्त्वाचे आहे. एखाद्याने निसर्गाकडून जितके घेतले आहे, तेवढे परत केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन ही गुरुकिल्ली आहे.’’ त्यांनी जैवविविधता कायदा २००२ च्या तरतुदींच्या कार्यवाहीत यश मिळवण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता अधोरेखित केली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या राष्ट्रीय मोहिमेच्या प्रारंभासाठी गोव्याची निवड केल्याबद्दल आनंद  व्यक्त केला. त्यांनी जैवविविधता जपण्यासाठी गोव्यातील लोकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांचा उल्लेख केला.

या मोहिमेच्या प्रारंभाबरोबरच प्रत्येक जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्वोत्कृष्ट जैवविविधता व्यवस्थापन समितीला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले, तसेच हरित पत्रकार पुरस्कार अन् जैवविविधता जतन करण्यासाठी वैयक्तिक योगदान देणार्‍यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ म्हणजे काय ?

‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’मध्ये  जैवविविधतेच्या अनेक पैलूंविषयी सर्वसमावेशक नोंदी ठेवल्या जातात.

यामध्ये अधिवासांचे संवर्धन, भूमीवरील प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजातींचे  संरक्षण, आदिवासी प्रजाती, पशूधन, त्यांचे वाण आणि प्राण्यांच्या जाती, सूक्ष्मजीव आणि त्या त्या क्षेत्रातील जैवविविधतेविषयी इतर माहितीचा तपशील नोंदवला जातो. जैवविविधता कायदा २००२ अनुसार देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे जैवविविधता व्यवस्थापन समित्या (बीएमसी) निर्माण करण्यात आल्या असून त्या जैविक विविधतेचे संवर्धन, शाश्वत वापर आणि नोंदी करणास प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.