पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

‘२३.४.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्या नागेशी येथील घरी जाऊन त्यांच्याशी अनौपचारित संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’, असे घोषित केले. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे. २३.५.२०२३ या दिवशी या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

पू. सत्यनारायण तिवारी

५.  पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी संतपद प्राप्त करतांना सूक्ष्मातून युद्ध होऊन त्यांचा मृत्यूयोग टळून त्यांना जीवनदान मिळणे !

५ अ. कु. मधुरा भोसले : पू. तिवारीकाकांची आंतरिक साधना मध्यम स्तरापर्यंत होती आणि त्यांची वाटचाल संतपदाकडे चालू होती. ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ नये’, यासाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी त्यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून पू. सत्यनारायण तिवारीकाका यांना होणार्‍या तीव्र शारीरिक त्रासांमुळे ते रुग्णाईत होते आणि त्यामुळे त्यांना सतत झोपून रहावे लागत होते, तरीही त्यांची आंतरिक साधना चालू होती. त्यामुळे वाईट शक्तींनी त्यांच्यावर भीषण आक्रमण करून त्यांच्या मेंदूवर आघात केला. त्यामुळे त्यांना विस्मृतीचा त्रास चालू झाला.  अशा स्थितीतही त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून आंतरिक साधना अधिक तीव्र केली. त्यामुळे त्यांची आंतरिक साधना मध्यम स्तरावरून उच्चतम स्तरापर्यंत पोचली आणि त्यांच्यावर गुरुतत्त्वाची भरभरून कृपा झाली. त्यामुळे त्यांच्यावर आलेल मृत्यूचे गंडांतर टळले आणि त्यांना जीवनदान मिळाले.

५ आ. कु. आरती तिवारी :  वरील सूत्र बरोबर आहे. पू. बाबा आजारी पडल्यानंतर त्यांच्या मेंदूवर आघात झाला होता. त्यावर आध्यात्मिक उपचारांच्या अंतर्गत सदगुरु डॉ. मुकुल गाडगीळ काकांनी नामजप दिला होता. त्यांनी दिलेल्या नामजपामुळे पू. बाबांच्या मेंदूवर झालेला आघात भरून निघाला. वैद्यकीयदृष्ट्या स्थानिक वैद्यांना ‘पू. बाबांच्या मेंदूवर झालेला आघात बरा होणे’, हे एक आश्चर्यच वाटले. जेव्हा माझे पू. बाबा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले, तेव्हा त्यांच्या विस्मृतीचे प्रमाण उणावले.

६. पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी कठोर साधना करून अवघ्या १० मासांमध्ये शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त करणे, हे ऐतिहासिक नाविन्य असणे  

पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी वर्ष २०१९ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यानंतर वर्ष २०२२ जुलैच्या मासापर्यंत त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्केच होती. जुलै २०२२  ते एप्रिल २०२३ त्यानंतर अवघ्या १० मासांमध्ये त्यांनी आंतरिक साधना करून आणि अंथरुणाला खिळून असतांना खडतर प्रारब्धभोग भोग भोगत आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त केले. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या या आध्यात्मिक यशाची नोंद सनातन संस्थेच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये झालेली आहे. त्यांच्या या आध्यात्मिक यशाचे गमक पुढीलप्रमाणे आहे.

६ अ. पू. सत्यनारायण तिवारीकाका यांची मागील २० जन्मांमध्ये विविध योगमार्गांनुसार कार्यरत झालेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यामुळे झालेली साधना

पू. सत्यनारायण तिवारी यांना सूक्ष्मातून देवता आणि दिव्यात्मे भेटायला येणे 

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

. ‘२३.४.२०२३ या दिवशी माझ्या बाबांना (पू. सत्यनारायण तिवारी यांना) संत म्हणून घोषित केल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी डोळे मिटले. त्याच क्षणी मला सूक्ष्मातून दिसले, ‘७ सोनेरी कांती असलेल्या मुकुटधारी देवता पू. बाबांना पुष्पहार घालण्यासाठी त्यांच्यासमोर उभ्या आहेत.’

२. पू. सत्यनारायण तिवारी यांना सूक्ष्मातून दिव्यात्मे भेटायला येणे

२७.४.२०२३ या दिवशी दुपारी २.१३ वाजता पू. बाबा मला म्हणाले, ‘‘खिडकीत कुणीतरी आले आहे, बघ.’’ मी तेथे पाहिल्यावर मला कुणीही दिसले नाही. त्यानंतर पू. बाबा २ – ३ वेळा म्हणाले, ‘‘दिव्य रंग, दिव्य रंग.’’ त्यानंतर काही वेळाने त्यांनी मला पुन्हा ‘कुणी आले आहे का ?’, ते पहाण्यास सांगितले. त्या वेळी मी डोळे बंद करून पाहिले असता मला सूक्ष्मातून पांढर्‍या रंगाचा सूक्ष्मदेह दिसला. तो दिव्यात्मा असल्याचे मला जाणवले. तेव्हा मी पू. बाबांना म्हणाले, ‘‘तुम्ही सांगा बाबा, तुम्हाला कोण दिसत आहे ?’’

तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पांढर्‍या रंगाचा एक दिव्यात्मा आला आहे.’’ काही वेळाने त्यांनी मला सांगितले, ‘‘सूक्ष्मातून निळ्या रंगाच्या रूपात एक दिव्यात्मा भेटायला आला आहे.’’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. तिवारीकाकांची मुलगी), नागेशी, गोवा. (२८.४.२०२३)

कु. आरती तिवारी :  वरील सूत्रे बरोबर आहेत. वरील सारणीत कु. मधुरा यांनी भक्तीयोगाचा उल्लेख केला आहे. आम्ही घरी असतांना रामायण आणि श्रीकृष्ण या मालिका पहात होतो. त्यामधील सुदामा, शबरी आणि अन्य भक्तांचे दृश्य पहात असतांना पू. बाबांच्या डोळ्यांत भावाश्रू वहायचे. तसेच एकदा पू. बाबांची भेट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी चालू असतांना त्यांना ‘प.पू. डॉक्टरांच्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचे दर्शन होऊन तेच श्रीराम आहेत’, असे जाणवले. त्यामुळे त्या भावभेटीत त्यांच्याशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात साक्षात् प्रभु रामाशी बोलत आहेत’, अशी अनुभूती  पू. बाबांना आली. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन होऊन तेच श्रीराम आहेत’, अशीही अनुभूती आली होती.

७. संतपद प्राप्त केल्यामुळे ज्ञानयोगानुसार ‘प्रकाम्य बुद्धी’ कार्यरत होणे, भक्तीयोगानुसार ‘आत्मनिवेदन भक्ती’ चालू होणे आणि ध्यानयोगानुसार ‘तुर्या’ किंवा ‘सानंद’ समाधी अवस्था प्राप्त होणे

पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वी त्यांची अखंड भावावस्था असून ते ‘हंस’ या आध्यात्मिक अवस्थेपर्यंत पोचले होते. या अवस्थेत त्यांच्या बुद्धीमध्ये ‘प्रज्ञा’ नावाची सूक्ष्म बुद्धी कार्यरत झाली होती. २३.४.२०२३ या दिवशी जेव्हा त्यांनी संतपद प्राप्त केले, तेव्हा त्यांनी ‘परमहंस’ ही आध्यात्मिक अवस्था प्राप्त केल्याचे मला जाणवले.

(ही सूत्रे बरोबर आहेत. २३.२.२३ या दिवशी झालेल्या भावभेटीत सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी पू. बाबांच्या संदर्भात ‘पू. तिवारीकाकांची ‘परमहंस’ अवस्था आहे’, असे उद्गार काढले होते. – कु. आरती तिवारी)

या अवस्थेत सलोक, समीप, आणि सरूप अशा तिन्ही प्रकारच्या मुक्ती भक्ताला मिळतात. तसेच या अवस्थेत ‘ध्यानयोग’,  ‘भक्तीयोग’ आणि ‘ज्ञानयोग’  या तिन्ही योगमार्गांची गुणवैशिष्ट्ये एकत्रितरित्या कार्यरत होतात. त्यामुळे त्यांना ध्यानयोगानुसार ‘तुर्या’ (म्हणजे ‘जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती’, ही त्रिपुटी नष्ट होऊन ‘तुर्या’ ही चौथी अवस्था प्राप्त होणे)  किंवा ‘सानंद’ (म्हणजे सतत आनंदावस्थेत रहाणे) ही समाधी अवस्था प्राप्त झाली. तसेच त्यांची बुद्धी अधिक सात्त्विक झाल्यामुळे ती सूक्ष्मतर झाली आणि त्यांची ‘प्रकाम्य’ बुद्धी कार्यरत झाल्यामुळे त्यांना ‘आत्मज्ञान’ प्राप्त झाले. तसेच भक्तीयोगानुसार त्यांची ‘आत्मनिवेदन भक्ती’ ही  नवविधाभक्तींपैकी नवव्या क्रमांकाची भक्ती कार्यरत झाली. (‘आत्मनिवेदन भक्ती’ म्हणजे ईश्वराच्या अनुसंधानात राहून त्याला स्वत:च्या मनातील विचार निवेदन करणे म्हणजे सांगणे.)

८. विविध योगमार्गांनुसार साधना केल्यामुळे संतपद प्राप्त केल्यावर प्राप्त होणारी गुणवैशिष्ट्ये

प्रार्थना आणि कृतज्ञता : श्रीगुरूंच्या कृपेमुळेच पू. सत्यनारायण तिवारीकाका यांच्या संतपदाच्या भावसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा झाली आणि त्यातून अध्यात्मशास्त्रातील अनेक नवीन पैलू शिकायला मिळाले, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे. आम्हा साधकांवर श्रीगुरूंची अशीच अखंड कृपा राहो’, ही श्रीगुरुचरणी आर्त प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२५.४.२०२३)

(समाप्त)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.