१. मणीपूरमधील हिंसाचारामुळे स्थानिकांसह परप्रांतीय नागरिकांचे पलायन
‘गृहयुद्धामध्ये फसलेल्या सुदान येथून भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याविषयीच्या बातम्या थांबत नाहीत, तोच मणीपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारामुळे तेथे रहाणार्या परप्रांतीय नागरिकांनी स्वराज्यात पलायन करणे चालू केले आहे. जवळ जवळ सर्वच राज्य सरकारांनी मणीपूरमधून त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. सध्या रस्ता मार्ग असुरक्षित समजले जात आहेत. निश्चितच ही फार वेदनादायी गोष्ट आहे की, भारतीय नागरिकांना त्यांच्याच एका राज्यात भडकलेल्या हिंसाचारामुळे जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन करावे लागत आहे. ही निश्चितच सामान्य घटना म्हणता येत नाही. भारत काय यासाठीच बनला होता का की, तेथे एका भागातील हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांसमवेत परप्रांतीय नागरिकांनाही जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागेल ? याविषयी देशातील प्रत्येक जागरूक नागरिकाने विचार करणे आवश्यक आहे.
२. खेळांमध्ये मणीपूर सर्व राज्यांमध्ये अव्वल स्थानी
खरे म्हणाल, तर मणीपूरला कुणाची तरी दृष्ट लागली आहे, असे वाटते. उत्तर पूर्वेकडील हे लहानसे राज्य खेळांमध्ये सर्व देशासाठी एक उदाहरण ठेवत आले आहे. येथील महिला आणि पुरुष खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. तसे पहाता बंगाल राज्याला भारताची ‘फुटबॉलची राजधानी’ समजली जाते; पण मणीपूर आता भारताचा ‘फुटबॉलचा गड’ म्हणून पुढे येत आहे. वर्ष २०१७ मध्ये भारतात ‘आंतर १७ विश्वकप फुटबॉल स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्या भारतीय चमूमध्ये ८ खेळाडू एकट्या मणीपूरमधील होते. मणीपूरमधून देशाला मेरी कॉम आणि डिंको सिंह यांसारखे महान मुष्टीयोद्धा मिळाले आहेत. मणीपूर अतिशय विकसित राज्य असे नाही, तरीही ते खेळांमध्ये मोठमोठ्या राज्यांहून पुढे आहे. मागील टोकियो ऑलंपिक खेळांमध्ये भारतीय गटातील मणीपूरच्या खेळाडूंचे अभूतपूर्व प्रदर्शन संपूर्ण देश अभिमानाने बघत होता. वेटलिफ्टिंगमध्ये चानू मीराबाईच्या उत्तम प्रदर्शनाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने चांगला प्रारंभ केला होता. त्यांनी देशाच्या झोळीमध्ये रौप्य पदक टाकले.
३. बॉक्सिंगमध्ये भारताचा नावलौकिक वाढवणारी मणीपूरची मेरी कॉम
मुष्टीयुद्धपटू मेरी कॉम हिने माझ्यासमवेत राज्यसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. तुम्ही मेरी कॉम हिला ध्यानचंद किंवा सचिन तेंडुलकर यांच्या बरोबरीची खेळाडू समजू शकता. ती ६ वेळा ‘जागतिक विजेती’ राहिली आहे, तसेच एकदा तिने भारताला सुवर्ण पदकही मिळवून दिले आहे. या मिळकतीवर ती पाहिजे तेवढा अभिमान बाळगू शकते; पण ती अत्यंत नम्र आणि मनमिळाऊ महिला आहे. एकीकडे मणीपूरच्या महिला खेळाडूंच्या अभूतपूर्व योगदानामुळे सर्व देशाला अभिमान आहे, तर दुसरीकडे पूर्वाेत्तर भारत महिला सशक्तीकरणातही फार पुढे गेला आहे. अतिशय तुटपुंज्या सोयीसुविधा असतांनाही तेथील पालक त्यांच्या मुलांना खेळाच्या जगामध्ये प्रोत्साहन देत असतात.
मेरी कॉम आणि चानू मीराबाई यांच्यासारख्या महिला खेळाडू सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या सर्वांनी कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे नाव लोकप्रिय केले आहे. त्यांनी देशाला किती गौरव आणि आनंद यांचे क्षण मिळवून दिले आहे ?, याचा अंदाज कदाचित् त्यांनाही नसेल. ऑलिंपिकसारख्या व्यासपिठावर आपली सर्वश्रेष्ठता सिद्ध करणे, ही काही सामान्य गोष्ट निश्चितच नाही.
४. मणीपूरच्या रक्तातच खेळ !
जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होता, तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी विशेष करत असता. यामध्ये मणीपूरचे पहिले सुप्रसिद्ध मुष्टीयुद्धा डिंको सिंह यांचा समावेश होतो. त्यांनी वर्ष १९९७ मध्ये बँकॉकमध्ये किंग्स कप जिंकला. ते भारतीय नौदलामध्ये होते. त्यांनी वर्ष १९९८ मध्ये थायलंडमध्ये बँकॉक आशियाई खेळांमध्ये भारताला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले होते. दुर्दैवाने त्यांचे कर्करोगाने नुकतेच निधन झाले.
सध्या मणीपूरच्या ज्या चूरचंद्रमध्ये हिंसाचार झाला आहे, त्या जिल्ह्याचे नाव त्या महान विभूतीच्या नावावर आहे, ज्याने मणीपूरमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्याचा पाया रचला होता. राजा चूरचंद्र सिंह यांनी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर स्पर्धांचे आयोजन केले होते, तसेच विजेत्यांना मुक्त हस्ते पुरस्कारांचे वितरणही केले होते. मणीपूरच्या रक्तातच खेळ आहे. मणीपूरमध्ये अनेक स्थानिक देवतांच्या नावानेही सण साजरे केले जातात. त्यानिमित्त तेथे खेळांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
५. हिंदी भाषा शिकून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये योगदान देण्याचा मणीपूरवासियांचा प्रयत्न
सध्या उर्वरित पूर्वाेत्तर राज्यांप्रमाणे मणीपूरही हिंदी भाषा शिकत आहे. तेथे हिंदी समजणार्या आणि बोलणार्या लोकांची संख्या मर्यादित आहे. तसे पूर्वाेत्तर राज्यांमध्ये हिंदीच्या प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये ‘केंद्रीय हिंदी संस्थे’चे योगदान उल्लेखनीय आहे. या संस्थेचे गौहत्ती (गुवाहाटी), शिलाँग आणि दिमापूर ही केंद्रे सक्रीय आहेत. ही तिन्ही केंद्रे त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार करतात. मणीपूरमध्ये हिंदी साहित्य संमेलनाकडून वर्ष १९२८ पासून हिंदीचे प्रचारकार्य चालू झाले होते. काही वर्षांनी ‘राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा’ यांनीही मणीपूरमध्ये त्यांची शाखा उघडली. तेथे इंफाळच्या हिंदीप्रेमींनी मिळून ७ जून १९५३ ला ‘मणीपूर हिंदी परिषद’ची स्थापना केली. मणीपूरच्या दुसर्या प्रमुख हिंदी संस्थेचे नाव ‘मणीपूर राष्ट्रभाषा प्रचार समिती’ असे आहे.
६. प्रगतीकडे वाटचाल करणार्या मणीपूरमध्ये हिंसाचार होणे दुर्दैवी !
आता जरा विचार करा की, अशा प्रकारच्या आदर्श राज्यामध्ये हिंसाचार होणे किती वेदनादायी आहे ? मणीपूरमध्ये पुन्हा शांतता निर्माण झाली पाहिजे. राज्यात वर्ष १९९३ नंतर प्रथमच एवढा हिंसाचार झाला आहे. वर्ष १९९३ मध्ये झालेल्या हिंसाचारात एका दिवसात १०० हून अधिक लोकांना मारण्यात आले होते. आता अनुमाने ६० लोकांच्या हत्या झाल्या आहेत. राज्याच्या सर्व प्रमुख समुदायांच्या नेत्यांनी त्यांचे दायित्व म्हणून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला सहकार्य केले पाहिजे. हिंसाचाराने काहीच मिळणार नाही. राज्यामध्ये जर सतत अशांती आणि हिंसाचार चालू राहिला, तर राज्याची स्थिती बिकट होईल. तिकडे सरकारला राज्याच्या सर्व समाजासाठी काम केले पाहिजे. सरकारला त्यांच्या धोरणांच्या माध्यमातून सिद्ध करावे लागेल की, ते सर्व वर्गांना घेऊन एक समान विचार ठेवते. त्यांच्यासाठी सर्वच महत्त्वाचे आहेत.’
लेखक : आर्.के. सिन्हा, ज्येष्ठ संपादक, स्तंभलेखक आणि माजी खासदार (साभार : साप्ताहिक ‘पांचजन्य’, १३.५.२०२३)