समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी !

आर्यन खान याच्या अटकेचे प्रकरण

समीर वानखेडे

मुंबई – आर्यन खान याच्या अटकेच्या प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सलग दुसर्‍या दिवशी तत्कालीन अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एन्.सी.बी.चे) आणि आय.आर्.एस्. अधिकारी समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी केली. त्यांची चौकशी करण्यासाठी देहली येथून सीबीआयचे अधिकारी आले आहेत. त्यांच्या मालमत्तेविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी संपल्यानंतर ‘सत्यमेव जयते’ म्हणत वानखेडे सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडले.

एन्.सी.बी.ने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. त्यानंतर सीबीआयने वानखेडे यांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या. याविरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. १९ मे या दिवशी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.