गोवा : ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ युद्धनौकेवरून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून ‘ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पणजी, १४ मे (वार्ता.) – ‘प्रोजेक्ट १५-बी’ युद्धनौका बांधणी प्रकल्पातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रक्षम युद्धनौका ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ ही डिसेंबर मासात नौदलाच्या ताफ्यात भरती करण्यात आली होती. भारतीय नौदलाने १४ मे या दिवशी ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून ‘ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली. ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून क्षेपणास्त्राची घेण्यात आलेली ही पहिलीच चाचणी आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची शक्ती अनेक पटींनी वाढली आहे.

शक्तीशाली विनाशिका ‘आय.एन्.एस्. मुरगाव’

१. भारत आता पाण्यावरूनही चीन आणि पाकिस्तान यांसारख्या शत्रूराष्ट्रांवर आक्रमण करून काही मिनिटांतच तेथे आग लावू शकतो.

२. ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ची लांबी १६३ मीटर आणि रुंदी १७ मीटर आहे. युद्धनौकेचे वजन सुमारे ७ सहस्र ४०० टन आहे.

३. ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ ही नौदलाची सर्वांत शक्तीशाली युद्धनौका आहे. तोफेने सुसज्ज असलेली ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ युद्धनौका ३०० कि.मी. अंतरावरूनही लक्ष्य वेधते. यामध्ये ‘एके-६३०’ क्षेपणास्त्रविरोधी तोफप्रणाली बसवण्यात आली आहे. याखेरीज ती पाणबुडीविरोधी ‘रॉकेट लाँचर’नेही सुसज्ज आहे.

४. विशेष म्हणजे ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ ही युद्धनौका आणि तिच्यावरील शस्त्रे ही पूर्णपणे स्वदेशी आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या अंतर्गत ही सिद्ध करण्यात आली आहेत.

‘आय.एन्.एस्. मुरगाव’ नामकरणाद्वारे गोवा मुक्तीलढ्याला सलामी

मुरगाव हे गाेवा मुक्ती संघर्षाचे केंद्र होते. याच कारणामुळे नवीन युद्धनौकेचे ‘मुरगाव’ असे नामकरण करण्यात आले. याद्वारे नौसेने गोवा मुक्तीलढ्याला सलामी दिली आहे. ही विनाशिका १९ डिसेंबर म्हणजेच गोवा मुक्तीदिनी समुद्रात सोडण्यात आली होती.