दाहक वास्तव दाहकतेने दाखवणारा ‘द केरल स्टोरी’ !

‘द केरल स्टोरी’

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट संपतो, तेव्हा क्षणभर कुणीही पटकन खुर्चीतून उठत नाही. संवेदनाच इतक्या बधीर झालेल्या असतात की, कोणती आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी, हे कुणालाच समजत नाही. Numb is the word (सुन्न हाच शब्द आहे.). चित्रपट पाहून झाल्यावर तुम्ही अंगावर काटा घेऊनच उठता आणि आजूबाजूला कितीही अनोळखी माणसे असली, तरी त्या वेळी प्रत्येक जण एकमेकांकडे पहात डोळ्यांनी हेच बोलत असतो, ‘‘हे सगळे किती अमानुष आहे आणि आपण वर्षानुवर्षे हे सहन करत आहोत.’’

१. एखादा धर्मच अंध होतो, ते पाहून ‘सुन्न’ होणे

तुम्ही धर्मप्रेमी असा किंवा नसा, देशप्रेमी असा किंवा नसा, आस्तिक असा किंवा नसा, विशिष्ट राजकीय विचारसरणीचे पाईक असा किंवा नसा, त्याने काही फरक पडत नाही; मात्र माणूस असाल आणि संवेदना अजून जाग्या असतील, तर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हृदयाला हात घातल्याखेरीज रहात नाही. ‘कोणताही धर्म वाईट नसतो’, हे आपल्याला शिकवले गेलेले असते; पण एखादा धर्मच जेव्हा अंध होऊन तो किती निर्घृणपणे दिशाहीन होत जातो, हे पाहून सुन्न व्हायला होते.

२. मोक्षप्राप्तीकडे घेऊन जातो तो खरा धर्म !

‘‘आई, आय फील सो हॅपी टू बी बॉर्न अ हिंदु !’’ (आई, मला हिंदु म्हणून जन्माला आल्याचा आनंद वाटतो), हे चित्रपट पाहिल्यानंतर आलेले माझ्या तरुण लेकीचे शब्द आहेत. समानता आणि स्वातंत्र्याचे संस्कार झालेली ही पिढी आहे. तिच्या तोंडून असे वाक्य येणे, हे माझ्यासाठी जरा आश्‍चर्याचे होते. तिला इतकेच सांगितले, ‘‘कायम योग्य मार्गावर चालायला शिकवतो, माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवतो.

आयुष्यात आनंद आणि जिव्हाळा घेऊन येतो, प्रेम करायला शिकवतो तो खरा धर्म, कायम मुळाशी रहायला शिकवतो, मोक्षप्राप्तीकडे घेऊन जातो तो खरा धर्म आणि आयुष्याचा खरा अर्थ शिकवतो तोच खरा धर्म. जन्माने हिंदु धर्म मिळाला आहे, त्याचे सोने कर आणि हीच सगळी शिकवण कायम लक्षात ठेव.’’

३. दाहक वास्तव दाहकता मांडणे महत्त्वाचे !

‘नकारात्मकता नको, डिप्रेसिंग (निराशाजनक) गोष्टी पहायला आवडत नाहीत, अतीरंजित आहे, धार्मिक तेढ वाढवणारा चित्रपट’, असे म्हणत ‘द केरल स्टोरी’ पहायचे टाळू नका. दाहक वास्तव तितक्याच दाहकतेने समोर यावे लागते, तेव्हा कुठे चटके बसून माणूस थोडाफार जागा होतो.

‘आता तर तू आई झाली आहेस. आता कळले ना बाळा, आपले मूल आपल्यापासून दूर गेले की, कसे वाटते ते ?’, हे शालिनीच्या आईचे शब्द चित्रपट संपल्यानंतरही डोक्यात घुमत रहातात. ‘प्रत्येक शालिनी आपल्या घरी सुखरूप परत यावी’, हीच प्रार्थना मनोमन करत आपण सिनेमागृह (थिएटर) सोडतो.

– गौरी ब्रह्मे

(साभार : फेसबुक)