योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी समाजातील वंचित घटकांसाठी काम केले ! – विलास पुजारी, पोलीस निरीक्षक

‘शेवगाव गुरुदत्त सामाजिक संस्थे’चा किराणा साहित्याच्या विनामूल्य वाटपाचा उपक्रम !


शेवगाव – समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या सुख-दु:खाचा विचार करून प्रसंगी साहाय्याचा हात देणे, ही खरी सामाजिक जाणीव आहे. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी समाजाच्या वंचित घटकांसाठी काम केले. त्यांच्या पश्चातही ते काम नियमितपणे चालू आहे. ही त्यांचे विचार आणि कार्य यांची देणगी आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले. ‘शेवगाव गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या वतीने योगतज्ञ

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्रीदत्त देवस्थानच्या दादाजी प्रसादालयात शहर आणि परिसरातील १०० गरीब अन् गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे विनामूल्य वाटप करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी पुजारी बोलत होते.

सनातनचे साधक अतुल पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार छगन वाघ, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, साहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट, ज्येष्ठ साधक रवींद्र पुसाळकर, दादा नाटेकर, ‘गुरुदत्त संस्थे’चे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे आदी प्रमुख उपस्थित होते.

या वेळी साहाय्यक गटविकास अधिकारी गाट म्हणाल्या की, गुरुदत्त सामाजिक संस्थेने समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव ठेवून गोरगरीब कुटुंबांना किराणा वाटप करण्याचा उपक्रम अव्याहतपणे चालू ठेवला आहे. इतर स्वयंसेवी संस्थांनीही असे समाजोपयोगी आणि पूरक उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे.

या वर्षी मुंबई येथील उद्योजक तथा साधक गिरीश साठे आणि पुणे येथील साधक नानासाहेब परभणे यांच्या योगदानातून किराणा साहित्य वाटण्यात आले. प्रास्ताविक अर्जुनराव फडके यांनी, तर सूत्रसंचालन दिलीप फलके यांनी केले. काकासाहेब लांडे यांनी आभार मानले.