फरीदाबाद (हरियाणा) येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा संकल्प !

  • सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

  • शोभायात्रेमध्ये १५० हून अधिक हिंदूंचा सहभाग

धर्मध्वज पूजनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि महिला धर्मप्रेमी

फरीदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेच्या माध्यमातून १५० हून अधिक हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी एकत्र येण्याचा संकल्प केला.

सिद्धपीठ हनुमान मंदिरामध्ये श्री. यशपाल मेहंदीरत्ता (राजूजी) आणि मंदिर समितीचे इतर सदस्य यांच्या हस्ते ब्रह्मध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखध्वनीसह शोभायात्रेला प्रारंभ झाला. शहरातील महत्त्वाच्या मार्गाने जाऊन शोभायात्रेचा समारोप सनातन धर्म मंदिर येथे करण्यात आला. या वेळी प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित हिंदूंना समारोपीय मार्गदर्शन केले.

‘हिंदू एकता शोभायात्रे’त हिंदुत्वनिष्ठांसह घोषणा देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

संघटित शक्ती ही कलियुगातील धर्मशक्ती ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपला हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार आहेच; पण आपण आपले शेजारी, मित्र परिवार आणि नातेवाइक यांनाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. संघटित शक्ती ही कलियुगातील धर्मशक्ती मानली जाते. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि महिला धर्मप्रेमी

शोभायात्रेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी

पीठ परिषदेचे हरियाणा प्रांत संयोजक श्री. प्रवीण गुप्ता, निष्काम सेवा समितीचे प्रमुख श्री. हुकूमचंद पाली सेठिया, नेहा पब्लिक स्कूलच्या शिक्षकांसह २५ विद्यार्थी, राजीव दीक्षित स्वदेशी रक्षक संघाचे संस्थापक श्री. अरविंद त्यागी, युवा राष्ट्र चिंतन समितीचे स्वयंसेवक, ३ जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रेम खट्टर, अखिल विश्व गायत्री परिवारचे साधक, ग्रीन इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट, बालाजी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशनचे प्रतिनिधी, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, धर्म जागरण समन्वयचे धर्मप्रेमी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक आदी सहभागी झाले होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. समाजातील अनेक लोकांनी पालखीमध्ये असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्प अर्पण केले. काही ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

२. शोभायात्रेत सहभागी होणार्‍या हिंदूंसाठी समाजातील लोकांनी पाणी आणि सरबत यांची व्यवस्था केली होती.

३. ‘निष्काम सेवा समिती’चे प्रमुख श्री. हुकूमचंद पाली सेठिया आणि ‘३ जी मार्केट असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रेम खट्टर हे दोघेही मिरवणूक पाहून म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये ही शोभायात्रा काढण्यात आली, तशी आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.’’

क्षणचित्रे

१. शोभायात्रेसमोर धर्मध्वज, त्यामागे सनातन संस्थचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, विविध संघटनांचे कार्यकर्ते हातांमध्ये हस्तफलक, भगवा ध्वज पकडलेले विद्यार्थी, स्वयंसेवक, धर्मप्रेमी आणि साधक; हिंदु धर्मावर आघात अन् त्यावर उपाय सांगणारे रंगीत हस्तफलक, फ्लेक्स आणि सुवचने यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी समाजातील लोक धर्मध्वज आणि पालखी यांना भावपूर्ण नमस्कार करत होते.

२. शोभायात्रेमध्ये गुरुपरंपरा दर्शवणारी पालखी, हिंदु राष्ट्राविषयी प्रेरणादायी विचार दर्शवणारा चित्ररथ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशातील बालसाधक-बालसाधिका आणि रणरागिणीचे पथक यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

३. या शोभायात्रेमध्ये ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘कौन चले रे.. कौन चले…हिंदू राष्ट्र के वीर चले’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्याला विविध पंथातील भाविकांनी केलेल्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या जयघोषाची साथ मिळाली. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले.

४. सिद्धपीठ हनुमान मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी विविध संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली.

५. शोभायात्रा पाहून लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. या वेळी अनेकांनी घराबाहेर येऊन शोभायात्रेचे चित्रीकरण केले, तर काहींनी छायाचित्रे काढली. तसेच घोषणा दिल्या.