‘१४.५.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याचे औचित्य साधून कृतज्ञतेचे काही मोती त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. कौटुंबिक जीवनात आणि साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणे
‘वर्ष १९८५ मध्ये माझा विवाह झाला. पू. दातेआजींनी मला सून म्हणून कधीच वागवले नाही. त्यांनी मला अतिशय ममतेने सर्व शिकवले आणि मला घडवले. त्यांनी आम्हाला सांभाळून घेतले. वर्ष १९९४ मध्ये मी साधनेला आरंभ केला. तेव्हा माझी मुलगी ८ वर्षांची होती. त्या वेळी मी नोकरी करत होते. मी केवळ पू. आजींमुळे सेवा करू शकत होते. त्या मला सांगत, ‘‘तू बाहेर जाऊन सेवा कर. मी घरातील सांभाळते आणि नातीचेही करते.’’ पू. आजींनी दिलेला आधार आणि प्रोत्साहन यांमुळे मी साधनेत इतकी वर्षे टिकून आहे.
२. तरुणांना लाजवेल, असा उत्साह असणे
घरातील कामे, बाहेर जाऊन काही करायचे असल्यास किंवा सेवा असल्यास पू. आजी प्रत्येक गोष्टीत उत्साहाने सहभागी होतात. त्या ‘आमच्याकडून प्रत्येक कृती योग्य प्रकारे कशी होईल ?’, असे पहातात. सणाच्या दिवशी त्या चांगली साडी नेसतात. त्या आश्रमातील साधिकांच्या समवेत छायाचित्र काढतात. त्या आश्रमातील मुलींनी नेसलेली नवीन साडी किंवा घातलेला नवीन पोशाख जवळून पहातात आणि त्यांचे कौतुकही करतात.
३. तत्परता
त्या आम्हाला नेहमी सांगतात, ‘‘आळस हा आपला क्रमांक एकचा शत्रू आहे.’ ‘आमच्यात ‘तत्परता’ हा गुण येण्यासाठी त्या आम्हाला जाणीव करून देतात. त्या आम्हाला सतत सांगतात, ‘‘प.पू. गुरुदेवांना तत्परता आवडते. ‘कोणतीही गोष्ट नंतर करू’, असे आपले असता कामा नये.’’ पू. आजी या वयातही तत्परतेने प्रत्येक कृती करतात. त्या या वयातही पहाटे साडेतीन ते ४ वाजण्याच्या दरम्यान स्नान करायला जातात. त्या अंघोळीची पूर्वसिद्धता आदल्या रात्री न चुकता करतात जसे, स्वतःचे कपडे काढून ठेवणे, प्रसाधनगृहात नळाखाली बालदी ठेवणे.
४. इतरांना साधनेत साहाय्य करणे
पू. आजी आमच्या साधनेचा आढावा घेतात. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘मी साधनेचे काय प्रयत्न करू ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तू करत असलेली सेवा झाली की, लगेच नाम घ्यायचे. एक क्षणही वाया घालवायचा नाही.’’
५. इतरांचा विचार करणे
पू. आजी सतत इतरांचा विचार करतात. सध्या आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहातो. खोलीत आमच्या समवेत काही साधिका आहेत. पू. आजी पहाटे उठून अंघोळीला जात असतांना प्रत्येक कृती हळुवारपणे करतात. त्या अंघोळ करतांना ‘पाण्याचा आवाज येऊ नये’, याची काळजी घेतात. खोलीत झोपतांना लावण्यासाठी लहान दिवा आहे. पू. आजी सांगतात, ‘‘तो दिवा लावायला नको.’’ ‘त्या दिव्याखाली साधिका झोपते. तिच्या डोळ्यांवर उजेड पडून तिला त्रास होऊ शकतो’, असा पू. आजींचा विचार असतो. खोलीतील साधिका उठेपर्यंत पू. आजी प्रत्येक कृती अत्यंत हळुवारपणे करतात.
६. प्रीती
पू. आजींमधील प्रीतीमुळेच अनोळखी साधकही त्यांच्याकडे आकृष्ट होतात. साधक पहिल्या भेटीतच पू. आजींशी मोकळेपणाने त्यांच्या अडचणी सांगतात. साधक सांगतात, ‘‘पू. आजींना भेटल्यावर आनंद झाला.’’ काही वेळा आश्रमात पाहुणे येतात. त्यांच्यापैकी काही जणांनी आगाशीत बसलेल्या पू. आजींना पाहून सांगितले, ‘‘आजींकडे पाहून चांगले वाटते.’’
७. मायेतून अलिप्त
मागील २ मासांत आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींचे निधन झाले. याविषयी पू. आजींना सांगतांना आम्हाला वाटत होते, ‘‘हे ऐकून पू. आजींना त्रास होईल. त्या भावनाशील होतील’; परंतु त्या वेळी पू. आजी स्थिर होत्या. मला जाणवले, ‘पू. आजी सर्वांमध्ये असूनही अनासक्त आहेत. त्या अलिप्त आहेत.’ एकदा पू. आजींची मुलगी (श्रीमती अनुराधा पेंडसे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६९ वर्षे) आणि नात (सौ. सृष्टी गोगटे) आश्रमात आल्या होत्या. त्या पू. आजींना पुष्कळ दिवसांनी भेटत होत्या, तरीही पू. आजींनी स्वतःच्या दिनचर्येत पालट केला नाही.
८. अखंड अनुसंधानात आणि कृतज्ञताभावात असणे
`मला जाणवते, ‘पू. आजी देवाच्या अनुसंधानात अखंड असतात.’ ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे आपण किती आनंदात आहोत ! येथे आश्रमात राहू शकत आहोत’, याबद्दल पू. आजींना अत्यंत कृतज्ञता वाटते. या विचाराने काही वेळा त्यांची भावजागृती होते.
९. पू. दातेआजींच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
पू. दातेआजींनी सांगितल्यानुसार कृती केल्यावर ती सहजतेने पूर्ण होणे : ‘पू. आजींनी एखादे सूत्र सांगितले आणि आपण त्यांचे ऐकले, तर त्याचा लाभ होतो’, हे मी अनुभवले आहे. काही वेळा ‘घरातील एखादे काम किंवा सेवा तू आज कर’, असे पू. आजींनी सांगितल्याप्रमाणे मी केल्यावर ती गोष्ट पूर्ण होते’, असे पुष्कळ वेळा घडले आहे. काही वेळा माझ्याकडून चालढकलपणा होऊन ती कृती दुसर्या दिवशी केली गेल्यास, त्यात अडचणी येत असत.
मला पू. आजींची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ‘त्यांच्याकडून मला अखंड शिकता येऊ दे. त्यांची सेवा माझ्याकडून शरणागतीने, कृतज्ञताभावाने आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना अपेक्षित अशी होऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योती नरेंद्र दाते, (पू. दातेआजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |