प्रेमभावाने सगळ्यांशी जवळीक साधणार्‍या सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) !

उद्या वैशाख कृष्ण दशमी (१४.५.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या चरणी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘पू. दातेआजींविषयी लिहितांना मला अनेक प्रसंग आणि गोष्टी आठवू लागल्या. त्यांच्या प्रती वाटणार्‍या भावभावना शब्दात मांडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही; पण मी लिहिण्याचा प्रयत्न करते.

श्रीमती अनुराधा पेंडसे

१. सर्वांशी प्रेमाने वागून सर्वांच्या मनात स्वतःविषयी आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण करणे

‘पू. दातेआजींनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवल्या आहेत. त्या आम्हाला नेहमी सांगत असत, ‘‘आपल्याकडे जे जे उत्तम आहे, ते दुसर्‍याला द्यावे. कुणी कसाही वागला, तरीही आपण त्याच्याशी प्रेमाने आणि चांगलेच वागावे.’’ पू. आजींनी त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला जोडून ठेवल्याने त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे. सर्वांच्या मनात पू. आजींविषयी आदराचे आणि आपुलकीचे स्थान आहे.

२. कठीण प्रसंगात स्थिर राहून धैर्याने तोंड देणे

पू. आजींनी जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना स्थिर राहून धैर्याने तोंड दिले. वर्ष १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात माझे वडील कै. मोहन गणेश दाते नाशिक कारागृहात १८ मास स्थानबद्ध होते. तेव्हा माझा लहान भाऊ नरेंद्र (डॉ. नरेंद्र दाते, वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६४ वर्षे)  मुंबई येथे दंतवैद्यकीचे शिक्षण घेत होता आणि माझा सगळ्यात लहान भाऊ निरंजन ९ व्या इयत्तेत शिकत होता. या परिस्थितीलाही पू. आजींनी स्वाभिमानाने आणि खंबीरपणे तोंड दिले.

३. नियोजन करून घरातील सर्व कामे ठरलेल्या वेळी करणे

पू. आजींचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे ३.३० वाजता उठून आसंदीत बसून नामजप करणे, ५ वाजता स्नान करणे, भावपूर्ण देवपूजा करणे, पाणी पिण्याची भांडी, तांबे, चमचे, कप-बशा घासून ठेवणे, स्वयंपाकाची सिद्धता करणे, दूध तापवणे, साय काढणे, दह्यासाठी विरजण लावणे, आवश्यक त्या किराणा सामानाची सूची करणे इत्यादी. त्या वर्षभरासाठी लागणारे धान्य आणून त्याची काळजीपूर्वक साठवण करणे, लोणची, मसाले, पापड करणे, असे अनेक वर्षे करत होत्या.

४. सनातनच्या साधकांना आपलेसे करणे

वर्ष १९९४ मध्ये डॉ. नरेंद्र सनातनच्या सत्संगाला जाऊ लागला. तो सत्संगातील सूत्रे घरी सांगत असे. पू. आजींना सत्संग आवडू लागले. संस्थेचे कार्यही वाढू लागले. सेवेच्या निमित्ताने साधकांचे पू. आजींच्या घरी येणे-जाणे होत असे. तेव्हा घरी येणार्‍या प्रत्येकाला पू. आजींनी आपलेसे केले. येणारा प्रत्येक जण घरचाच होऊन गेला. नंतर सर्व कुटुंबीयही साधना आणि सेवा करू लागले.

५. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे

पू. आजींच्या खंबीर पाठिंब्यामुळे दोन्ही मुले आणि सुना साधना अन् सेवा करू शकत आहेत. पू. आजी मुले आणि सुना यांना त्यांच्या साधनेविषयी विचारत असत. त्यांची मुले किंवा सुना यांपैकी कुणी प्रवचन घेणार असतील, तर पू. आजी त्यांचा सरावही घेत असत.

६. पू. आजींमुळेच साधना आणि सेवा करता येणे अन् जीवनात आनंद देणारा मार्ग मिळणे

पू. आजींमुळेच मी सत्संगाला जाऊ लागले. नंतर मला निरनिराळ्या सेवा करण्याची संधी लाभली. साधक सेवेच्या निमित्ताने आमच्या घरी निवासाला येत असत. तेव्हा पू. आजी सांगत, ‘‘घरी आलेल्या प्रत्येकाचे आनंदाने आदरातिथ्य करावे. सेवेने माणूस झिजत नाही. सेवेतून आनंदच मिळत असतो. सेवा मनापासून कर.’’ त्यामुळे मलाही अनेक सेवा शिकता आल्या. मला काही सेवांचे दायित्व मिळाले. गुरुदेवांनी माझ्याकडून त्या सेवा करूनही घेतल्या. पू. आजींमुळेच माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळाली आणि आनंद देणारा मार्ग मिळाला.

७. तत्त्वनिष्ठ

पू. आजी वेळोवेळी प्रत्येकाचे कौतुक करून प्रोत्साहनही देतात. कुणाचे काही चुकत असेल, तर पू. आजी त्याला त्याची जाणीवही करून देतात. आम्ही लहान असतांना आमच्याकडून काही चूक झाल्यास पू. आजी आम्हाला देवापुढे नाक घासून क्षमा मागायला लावत. तेव्हा आम्हाला पुष्कळ अपराधी वाटत असे आणि रागही येत असे; मात्र ‘चुका स्वीकारून क्षमा मागण्याने मन कसे हलके होते !’, ते आता जाणवते.

८. पू. आजींचे पुण्यातील घर म्हणजे सनातनचा आश्रम असणे

प्रथम आम्ही २ खोल्यांच्या घरात रहात होतो. तेथेही नातेवाईक आणि वडिलांचे मित्र येत असत. पू. आजींनी घरातील सर्व कामे आणि घरी येणार्‍या लोकांचा पाहुणचार आनंदाने केला. वर्ष १९८७ मध्ये पू. आजींचे स्वतःचे घर झाले. वर्ष १९९४ पासून घरी सत्संग होऊ लागले. घरी दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे येत असत. तेथून दैनिक ‘सनातन प्रभात’ नेणे साधकांना सोयीचे होत असे. स्वारगेट बसस्थानक घराच्या जवळ असल्याने परगावी जाणार्‍या साधकांची सोय होत असे. हे घर म्हणजे पुण्यातील सनातनचा आश्रम झाला. या आश्रमात सूक्ष्मातून दुर्गादेवी अवतरली. येथे पंचमुखी हनुमान कवच यज्ञ झाला. पुण्यात होणार्‍या कार्यक्रमांची सिद्धता या आश्रमात होत असे. साधक संघभावाने साहाय्य करत. अनेक संतांचे चरण आश्रमाला लागले. पूर्वी या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वास्तव्य असे. पू. दातेआजींचा आश्रम पावन झाला.

९. आपत्काळाच्या दृष्टीने स्थलांतर करतांना स्वकष्टार्जित आणि ३४ वर्षे वास्तव्य केलेले घर सहजतेने सोडून जाणे

आपत्काळाच्या दृष्टीने स्थलांतराची सिद्धता चालू झाली. स्वकष्टार्जित आणि ३४ वर्षे निवास असलेले घर सोडून जातांना पू. आजी अतिशय शांत आणि स्थिर होत्या. १३.३.२०२१ या दिवशी पू. आजी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या मोठ्या आश्रमात गुरुदेवांच्या चरणांशी निवासाला आल्या. पू. आजी सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहिल्या. त्या नोव्हेंबर २०२२ पासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आहेत.

१०. पू. आजींची गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) अतूट श्रद्धा आणि अपार भक्ती आहे. ‘गुरुमाऊली आपल्या समवेत आहेत’, असा त्यांचा भाव आहे.

११. पू. आजींमध्ये झालेले पालट 

अ. पू. आजींचा चेहरा निरागस बालकाप्रमाणे झाला आहे.

आ. त्यांचे हास्यही अगदी बाळासारखे वाटते.

इ. त्यांची त्वचा मुलायम झाली आहे.

ई. त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘त्या सतत देवाच्या अनुसंधानात आहेत. त्यांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवते.

‘गुरुदेवा, आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना करून घ्या. आम्हाला अखंड भावाच्या स्थितीत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे. ‘पू. दाते आजींविषयी लिहून घेतले’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्रीमती अनुराधा अच्युत पेंडसे (पू. दातेआजींची मुलगी), (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद  पनवेल. (२२.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक