आज तिथीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंना एक मंत्र दिला ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदुंचे सैनिकीकरण करा !’ दुसर्या महायुद्धाच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंना इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याचा समादेश दिला. त्यासाठी देशभर दौरा काढला आणि म्हणून त्यांना ‘रिक्रूटवीर’ (भरतीवीर) म्हणून हिणवण्यात आले, तरी पण ते डगमगले नाहीत. त्यांनी स्वतःचा कार्यक्रम चालूच ठेवला. आपण त्याचे परिणाम जाणतो. ‘आझाद हिंद सेनेचे’ नेतृत्व स्वीकारल्यानंतर सुभाषबाबूंनी सिंगापूर येथील आझाद हिंद रेडिओवरील प्रथम भाषणात आझाद हिंद सेनेला जे सैनिक मिळाले त्याचे श्रेय त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिले.
‘हिंदूंचे सैनिकीकरण’ या मंत्राचा असा लाभ झाला की, इंग्रज सैनिकांमध्ये पूर्वी मुसलमान सैनिकांचा भरणा अधिक होता. ही स्थिती पालटून आता सैनिकांमध्ये हिंदूंची संख्या वाढली. त्यांच्यामध्ये ‘राष्ट्रभक्तीचा’ संचार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून भूदल, वायूदल आणि नौदल यांतील सैनिकांनी बंड केल्याने इंग्रजांना हा देश सोडून जावे लागले. हा इतिहास आहे; पण आपण तो विसरत आहोत. आपण पुन्हा निर्बल होत आहोत. आज आपण पुन्हा आपले सशक्तीकरण थांबवले आहे. आपण पुनःपुन्हा शत्रूकडून मार खात आहोत. आपल्या आया-बहिणी पळवल्या जात आहेत. देवतांची विटंबना होत आहे. मंदिरे फोडली जात आहेत. देवतांच्या मिरवणुकांवर दगडफेक होत आहे, आक्रमणे होत आहेत. सत्य दाबले जात आहे. तुम्हाला बंधुभावाचे डोस पाजले जात आहेत; कारण तुम्ही अशक्त आहात, निर्बल आहात. म्हणूनच पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेला ‘हिंदूंचे सैनिकीकरण करा !’, हा मंत्र आचरणात आणण्याची वेळ आली आहे. पोलीससुद्धा तुमचे रक्षण करू शकत नाहीत. शासनकर्ते राजकारण करण्यात गुंग आहेत. तुम्हाला कोण वाचवणार आहे ? |
१. राजकारणाचे हिंदुकरण
‘हिंदुहिताचे राजकारण करणार्यांनाच हिंदूंनी पाठिंबा द्यावा किंवा राजकीय पक्षांनी हिंदु हितदक्ष रहाण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यावर दबाव ठेवावा’, असे सावरकर यांचे मत होते. यालाच राजकारणाचे ‘हिंदुकरण’ म्हणतात; परंतु जनतेने सावरकर यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. परिणाम म्हणून अहिंदू हितदक्ष राजकीय पक्षांकडे हिंदुस्थानची सत्ता गेली आणि हिंदूंना फाळणीला सामोंरे जावे लागले. फाळणी झालेला पाक हा इस्लामी देश आणि उरलेला देश ‘हिंदु राष्ट्र’ न होता ‘धर्मनिरपेक्ष’ देश झाला. हिंदूंचे न्याय हक्क हिरावले गेले; कारण आपण राजकारणाचे हिंदुकरण केले नाही. आपण आता हळूहळू त्या दिशेने पाऊल टाकत आहोत. ‘राजकारणाचे हिंदुकरण’ या मंत्राचे आचरण आपल्याला करावेच लागेल, तर आणि तरच आपले राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होईल.
२. तत्पूर्वी हिंदूंचे हिंदुकरण करा !
राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा, हा मंत्र आचरण्यापूर्वी ‘हिंदूंचे हिंदुकरण’ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण केवळ जन्माने हिंदु आहोत. आपल्याला ना आपल्या धर्माचे ज्ञान आहे, ना आपण साधना करत आहोत. प्रत्येक जातीच्या संघटनांचे नेते हिंदु धर्माला नावे ठेवत आहेत, देवतांची टिंगलटवाळी करत आहेत आणि घरात देवतांची पूजा करणारे आपण ते निमूटपणे ऐकत अन् टाळ्या पिटत आहोत. हा एवढा मूर्खपणा आपल्यात कुठून आला ? तर याला कारण धर्मशिक्षणाचा अभाव ! आपल्याला धर्मशिक्षण नसल्यामुळे आपण धर्मावर आक्षेप घेणार्यांना उत्तर देऊ शकत नाही आणि धर्माचरण नसल्यामुळे त्यांना उत्तर देण्याचे धैर्य आपल्यामध्ये नाही. धर्ममार्तंडांनी जनतेला धर्मशिक्षण दिले नाही, तर धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने हिंदु धर्माचे शिक्षण शासकीय पातळीवर देण्यावर बंधने घातली. त्यामुळे हिंदूंचे धर्मशिक्षण बंद पडले. आता सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतः हिंदु समाजाचे हिंदुकरण केले पाहिजे.
३. हिंदुविरोधी कलम २८ आणि ३० रहित करा !
राज्यघटनेतील कलम ३० नुसार कोणतीही मुसलमान आणि ख्रिस्ती संस्था शासकीय निधी घेऊन धार्मिक शिक्षण देऊ शकते. मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी शाळेची स्थापना केली, तर ती ‘कलम ३०’च्या अंतर्गत येईल अन् तिथे शिकणारे विद्यार्थी १०० टक्के हिंदु असले, तरी त्यांना कुराण आणि बायबल शिकता येईल; पण एखाद्या हिंदूने शाळेची स्थापना केली, तर ती ‘कलम २८’च्या अंतर्गत येईल आणि तिथे शिकणारे १०० टक्के विद्यार्थी हिंदु असले, तरी त्यांना वेद अथवा गीता शिकता येणार नाही. अशा जाचक कायद्यांमुळे हिंदू धर्मशिक्षणाला मुकले. आताच्या केंद्रशासनाने ही दोन्ही कलमे त्वरित रहित करावीत आणि हिंदूंना धर्मशिक्षणाचा मार्ग मोकळा करावा. यावरून आपल्याला ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’, हा मंत्र हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी किती महत्त्वाचा आहे ? ते लक्षात येईल.
– डॉ. नीलेश निवृत्ती लोणकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच (साभार : मासिक ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २०२२)