आईस्क्रीम हा आपल्या सर्वांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय ! आईस्क्रीममधील प्रमुख घटक कुठला ? दूध. असेच उत्तर बहुतेक जण देतील; पण आईस्क्रीम हे दुधापासून बनत नसते, ते बनते तेल आणि वनस्पती तूप यांच्या मिश्रणापासून ! खोटे वाटते ना ? पण खोबरेल तेल आणि वनस्पती तूप यांचा ‘बेस’ (आधार) वापरून त्यात दुधाची पावडर आणि ‘फ्लेवर्स’ (चवीसाठी वापरण्यात येणारे घटक), तसेच अन्य ‘प्रिझर्व्हेटीव्हस’ (अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात घालण्यात येणारे रसायन) घालून आईस्क्रीम बनते. तेल वापरल्याने आईस्क्रीम टिकण्याचा काळ वाढतो. तसेच ते स्वस्तात सिद्ध होते. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या याच घटकांपासून आईस्क्रीम बनवतात. आईस्क्रीम खातांना आपले तोंड तूपकट झाल्यासारखे वाटते, हा आपला नेहमीचा अनुभव असेल. त्यातील दुधामुळे तसे होते, असे आपल्याला वाटत असते. प्रत्यक्षात मात्र हे त्यातील तेलामुळे होते. शब्दशः सांगायचे झाल्यास आईस्क्रीम खाऊन आपले तोंड ‘तेलकट’ होते.
असे आहे, तर मग याविषयी कुणीच काही कारवाई का करत नाही ? इथेच खरी मेख आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार अपेक्षित असलेले ‘फॅट’चे प्रमाण या आईस्क्रीममध्ये पूर्ण केलेले असल्याने त्यात अन्य काय घटक आहेत ? याच्याशी कुणालाही कर्तव्य नसते. किंबहुना त्यातील घटक वेष्टनावर नमूद केलेले असूनही आपण वाचतच नाही. प्रत्यक्षात केवळ दुधापासून बनवण्यात आलेले आईस्क्रीम हे ‘डेअरी आईस्क्रीम’ या नावाने मिळते. त्याचा टिकण्याचा काळही अल्प असतो. (संदर्भ : ‘द डेली मेल, युनायटेड किंगडम, ११ डिसेंबर २०१४)
या पद्धतीने तेल-वनस्पती तूप या मिश्रणातून सिद्ध झालेल्या आईस्क्रीममुळे आरोग्यास अपायही होऊ शकतो, असे कित्येक तज्ञांचे मत आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे !!
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेदतज्ञ, डोंबिवली.