सांगली – नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि अमृतवाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी योग्य ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन कामगारमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कृष्णा, माणगंगा, कोरडा, महाकाली, येरळा, अग्रणी आणि तिळगंगा या ७ नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. शेवटी या सर्व कलशांचे कृष्णा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जलसंपदा विभगाच्या कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :नदीचे प्रदूषण झाल्यानंतर उपाययोजना काढण्यापेक्षा ती प्रदूषितच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! |