छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड : काँग्रेसच्या नेत्याचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक

अन्वर ढेबर

रायपूर – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड केला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा मोठा भाऊ अन्वर ढेबर याला अटक करण्यात आली आहे. आरोपी अन्वर दारूच्या प्रत्येक बाटलीवर अवैध पैसे कमवत होता.

या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अन्वर ढेबरला अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. पोलिसांनी याविषयीचे अन्वेषण केल्यानंतर यामध्ये एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले. आरोपी अन्वर राजकारणी आणि वरिष्ठ नोकरशहा यांच्यासाठी काम करत होता. छत्तीसगडमध्ये विकल्या जाणार्‍या दारूच्या प्रत्येक बाटलीवर अवैधरित्या पैसे गोळा करण्यासाठी त्याने एक व्यापक जाळे (नेटवर्क) सिद्ध केले होते. अन्वर ढेबर याने अवैधपणे देशी दारू बनवून त्याची सरकारी दुकानांमधून विक्री  केली, असे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले.

सनदी अधिकार्‍याचाही हात !

‘ईडी’ने आरोप केला आहे की, सनदी अधिकारी अनिल टुटेजा हासुद्धा अन्वरसमवेत दारूच्या व्यापाराच्या कटात गुंतला आहे. या कटातील संशयितांचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणात राज्यातील अनेक नोकरशहा आणि राजकारणी सहभागी आहेत, असे ‘ईडी’ ने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !