।। श्रीकृष्णाय नमः ।।
सर्वांचा आत्मा ईश्वराचाच अंश असतो हे खरे आहे, पण सर्वांचा आत्मा एकच नसतो. आत्मा ईश्वराचा अंश असतो, पण नुसता शुद्ध अंश नसतो. नुसता शुद्ध अंश असेल तर तो शरीरात येईलच कशाला? येणार नाही. कारण मनुष्यांना जन्म प्रारब्धामुळे घ्यावा लागतो आणि ईश्वर किंवा त्याच्या शुद्ध अंशाला प्रारब्धच नसते.
शरीरात येणारा आत्मा हा त्याच्यावरील त्रिगुणांचा प्रभाव आणि त्यांच्या परिणामांसहच आलेला असतो. भगवान् श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात –
ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:।
मन: षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।। अ. १५ श्लोक ७
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्र्वर: ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धनिवाशयात् ।। अ.१५ श्लोक ८
अर्थ – ह्या जीवसृष्टीत जीवात्मा हा माझाच सनातन अंश आहे. तो प्रकृतीत असलेल्या पाच इंद्रिये आणि मन, अशा सहांना खेचून घेतो. वायू ज्याप्रमाणे गंधांच्या कोषातून गंधांना घेऊन जातो त्याप्रमाणे ईश्वर (जीव बनलेला आत्मा) शरीर सोडताना ह्या सहांसह जातो आणि नवीन शरीर प्राप्त करताना त्यात ह्या सहांसह येतो.
हा अर्थ थोडा स्पष्ट समजून घेऊया. आधीच्या शरीरातील प्रत्यक्ष इंद्रिये आणि मन (अंत:करण) बरोबर जात नसून त्यांच्यावर झालेले संस्कार बरोबर जातात. आधीच्या जन्मातले प्रत्यक्ष मन जात असते, तर त्या जन्मातल्या अंतर्मनात साठलेल्या आठवणीसुद्धा पुढील जन्मात बरोबर आल्या असत्या, पण तसे घडत नाही. आधींच्या जन्मांमधील आई-वडील, शिक्षण, परिस्थिती, वातावरण, नातलग, मित्र-मैत्रिणी, कार्यक्षेत्र, घटना, प्रसंग इत्यादी अनेक गोष्टींचे मनावर संस्कार होत जातात. त्यामुळे स्वभाव, आवड-नावड-निवड इत्यादी प्रत्येकाचे जन्मजात वेगवेगळे असतात, हे आपण प्रत्यक्षात पाहतोच.
बृहदारण्यकोपनिषद्मधूनही (४-४-२) कळते की प्राण गेल्यावर आत्म्यासह ज्ञान (जाणीवकळा), कर्म (केलेल्या कर्मांची पाप-पुण्यरूप फळे) आणि पूर्वप्रज्ञा (अनुभूत विषयांच्या वासनांचे संस्कार), हे सुद्धा त्याच्यासह जातात.
वर सांगितल्याप्रमाणे शरीर सोडताना आत्मा जन्मांतरांच्या संस्कारांसह जातो आणि नवीन शरीरात त्या संस्कारांसह येतो. म्हणजे शरीर सोडणारा आत्मा निव्वळ शुद्ध आत्मा नसतो, अर्थात्च त्यामुळे नव्या शरीरात येणारा निव्वळ शुद्ध आत्मा नसतो. संस्कार प्रत्येकाचे वेगळे असतात आणि म्हणून संस्कारयुक्तच असलेला आत्मा प्रत्येकाचा वेगळा असतो. अशा प्रकारे शरीरात येण्याआधीच संस्कारयुक्त आत्मा एक वेगळी इकाई (unit) असतो.
आत्म्याचे एक कार्य आहे जाणीव करविणे. सुख-दु:खाचे प्रसंग आणि ते घडण्याचा समय प्रत्येकाचा वेगळा असतो आणि त्या सुख-दु:खाची जाणीव त्या आत्म्याच्या क्षेत्रापुरतीच असते. म्हणून एकाचे सुख-दु:ख दुसर्याला होत नाही.
अनंत आठवले
१५.०२.२०२३
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
(पू. अनंत आठवले हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.)