मालाड (मुंबई) येथे महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक !

मुंबई – ‘व्हिडिओ ‘लाईक’ करा आणि कमवा’ असे आमीष दाखवून मालाडमधील २९ वर्षीय महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (केवळ गुन्हा नोंदवून थांबू नका, तर संबंधित भामट्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)

तक्रारदार महिला वास्तूविशारद असून गर्भवती असल्यामुळे तिने नोकरी सोडली होती. ती अर्धवेळ कामाच्या शोधात होत्या. त्यांना २ मे या दिवशी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. संदेश पाठवणार्‍याने स्वतःची ओळख आलिया अशी करून दिली. ‘यूट्यूब व्हिडिओ लाईक करावे लागतील आणि त्यासाठी पैसे मिळतील’, असे संदेशात दिले होते. याप्रमाणे केल्यावर तिला अधिकाधिक पैसे देण्यात आले. काही काळाने तिच्याकडून पैशांची मागणी केली जाऊ लागली; पण त्या बदल्यात अधिक रक्कम मिळत असल्याने तिने आणखी पैसे गुंतवण्याचे ठरवले. नंतर तिला पैसे मिळण्याचे बंद झाले. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकहो, अनोळखी लोकांच्या सांगण्यावरून ऑनलाईन माध्यमांमध्ये पैसे गुंतवू नका !