गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

सर्वत्र व्‍याप्‍त असलेले सूक्ष्मातीसूक्ष्म अन् शाश्‍वत चैतन्‍यदायी तत्त्व, म्‍हणजेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘चैतन्‍यं शाश्‍वतं शान्‍तं व्‍योमातीतं निरञ्‍जनम् ।
नादबिन्‍दुकलातीतं तस्‍मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्‍लोक ७०

अर्थ : ‘जे चैतन्‍यस्‍वरूप, शाश्‍वत, शांत, आकाशाच्‍याही पलीकडे अस्‍तित्‍व असलेले, निष्‍कलंक, नादातीत, बिंदूतीत आणि कलातीत आहेत’, अशा श्री गुरूंना नमस्‍कार असो.’

भावार्थ : ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले केवळ मानवी देहधारी गुरु नसून ते साक्षात् चैतन्‍याचे मूर्तीमंत स्‍वरूप आहेत. चराचर सृष्‍टीसह पंचतत्त्वांवरही त्‍यांचे अधिपत्‍य असून ते पंचतत्त्वांच्‍याही पलीकडे आहेत. त्‍यांचे स्‍वरूप स्‍थुलातून दिसते, तसेच ते सूक्ष्मातीसूक्ष्म आणि सर्वव्‍यापीही आहे. सर्व व्‍यापूनही सर्वांच्‍या पलीकडे असलेले शाश्‍वत चैतन्‍यदायी तत्त्व, म्‍हणजेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! अशा श्री गुरूंच्‍या चैतन्‍यदायी तत्त्वाला कोटीशः नमन !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (३.५.२०२३)