‘हर घर सावरकर’ राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथे पार पडली !

राज्‍यव्‍यापी शिखर परिषदेत व्‍यासपीठावर उपस्‍थित मान्‍यवर

ठाणे – ‘हर घर सावरकर’ हे घोषवाक्‍य घेत राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या वेळी मोठ्या प्रमाणात सावरकर विचारांचे अनुयायी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ नागरिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. सावरकरांचा वारंवार होणारा अपमान, यावर उपाय आणि निर्बंध घालण्‍यासाठी अन् कारवाई करण्‍याची कायदेशीर तरतूद करण्‍यात यावी, यासाठी शासनाला एक निवेदन देण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले.

श्री. पार्थ बावस्‍कर आणि श्री. अक्षय जोग यांनी उपस्‍थित श्रोत्‍यांशी संवाद साधत सोप्‍या शब्‍दांत उदाहरणांद्वारे सावरकर कसे लोकांपर्यंत पोचवावेत ?, हे समजावून सांगितले, तर सावरकरांचे नातू श्री. सात्‍यकी सावरकर यांनी अल्‍प कालावधीत सावरकरांचे कार्य कसे पुढे नेता येईल ?, याविषयी सांगितले. अन्‍य मान्‍यवरांनीही त्‍यांचे विचार मांडले. ‘सावरकर यांचे आचार, विचार, व्‍यवहार यांची सकारात्‍मक ऊर्जा कार्यक्रमातून मिळाली’, असे सांगत ‘आपण सर्व सावरकरप्रेमी एकत्र आलो, तर टीकाकारांचे तोंड बंद व्‍हायला वेळ लागणार नाही’, अशी प्रतिक्रिया उपस्‍थितांनी दिली.

शिखर परिषदेत मांडण्‍यात आलेले ठराव

१. महाराष्‍ट्र शासनाच्‍या महापुरुषांच्‍या सूचीत स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव समाविष्‍ट करावे.

२. सर्व शासकीय कार्यालयात सावरकरांचे तैलचित्र लावावे.

३. सावरकरांचे सर्व साहित्‍य खंड स्‍वरूपात प्रसिद्ध करून माफक दरात महाराष्‍ट्रातील सर्व वाचनालये, शाळा, महाविद्यालये येथे उपलब्‍ध करावे, असे ठराव मांडण्‍यात आले.

ठरावाची प्रत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्‍यात आली.