कालीमातेचा अनादर केल्यावरून युक्रेनने भारताची मागितली क्षमा !

  • युक्रेनने श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन केल्याचे प्रकरण

  • हिंदूंनी केलेल्या तीव्र विरोधाचा परिणाम !

उजवीकडे युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कीव (युक्रेन) – युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदूंची आराध्य देवता श्री कालीमातेच्या चित्राचा अयोग्य प्रकारे उपयोग केला. युक्रेन आणि युक्रेनी जनता भारतीय संस्कृतीचे मनापासून आदर करतात अन् भारत त्यांना देत असलेल्या समर्थनाचे मनापासून कौतुक करतात, असे वक्तव्य युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा यांनी केले.

२ मे या दिवशी झापरोवा यांनी ट्वीट करत म्हटले की, या चित्राला आम्ही आधीच हटवले आहे. आम्ही एकमेकांमध्ये आदर आणि मैत्री यांच्या भावना वाढीस लागण्यास दृढ संकल्पित आहोत.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ‘कलेचा नमुना’ असे लिहीत प्रसारित केलेल्या चित्रातून कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन केले होते. चित्राच्या डाव्या बाजूला एका शहरावर बाँबद्वारे आक्रमण झाल्याने भूमीपासून आकाशापर्यंत स्फोट आणि त्यामुळे पसरलेला धूर असल्याचे छायाचित्र होते, तर उजव्या बाजूला श्री कालीमातेला हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मनरो हिच्या रूपात दाखवून धुराचा आकार देण्यात आला होता. या चित्राच्या विरोधात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली होती. बाला नावाच्या एका व्यक्तीने परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना उद्देशून ट्वीट करत म्हटले होते की, कालीमातेचा अवमान करणारा युक्रेन पुढील वेळी जेव्हा संयुक्त राष्ट्रांत साहाय्य आणि समर्थनाची भीक मागेल, तेव्हा त्याने केलेले हे विडंबन लक्षात असू द्या !

संपादकीय भूमिका 

भारताला नेहमीच पाण्यात पहाणार्‍या युक्रेनचे खरे स्वरूप ओळखा ! सध्या रशियामुळे संकटात सापडलेल्या युक्रेनचे हे नाटक आहे, हे लक्षात घ्या !