जळगाव जिल्ह्यासह राज्यात अवेळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवेळी पावसासह वादळी वारे आणि गारपीट यांमुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. सतत ३ दिवस पडलेला अवेळी पाऊस आणि गारपीट यांमुळे ज्वारी, बाजरी, मका, कांदा, सूर्यफूल, तीळ, लिंबू या पिकांची, तसेच केळी, आंबा, द्राक्ष या फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. गारपिटीमुळे पीक उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अनेक गावांत घरे, गोठे यांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आले. जामनेर तालुक्यात वीज पडून ८ गुरे, २ शेळ्या, १३ मेंढ्या दगावल्या, तर भर उन्हाळ्यात काही गावांतील नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले. अजिंठा डोंगरातून उगम असलेल्या वाघूर नदीला पूर आला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून त्याखाली वाहने दबली, गुरे दगावली, घरांची पडझड झाली. विजेचे खांब, तारा तुटल्या. त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
हे सर्व पहाता अवेळी पावसाचा फेरा कधी थांबणार ? असा प्रश्न शेतकर्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गारपिटीमुळे काही पिकांची पत खालावल्याने पिकांचे दर पडण्याची दाट शक्यता आहे. शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास यामुळे हिरावल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी वर्ष २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य’ वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे; परंतु राज्यात या भरड धान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरे, शेतमाल यांच्या हानीचे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनानेही हानी झालेल्या नागरिकांच्या साहाय्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा संपर्क क्रमांक घोषित केला आहे. त्यामुळे शेतकर्यांना कशा प्रकारे अधिकाधिक साहाय्य करता येईल, असा विचार होत आहे, असे दिसते; परंतु ‘निसर्गासमोर कुणी काही करू शकत नाही, हेच खरे !
हे सर्व लक्षात घेऊन संकटाला सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करून आणि साधना वाढवून भगवंताचे भक्त बनणे आवश्यक आहे. ‘न मे भक्तः प्रणश्यति’, असे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. या वचनाची अनुभूती अनेकांनी आतापर्यंत अनेकदा घेतलेली आहे; परंतु आपल्याला त्याचा विसर पडतो. भगवंताच्या स्मरणात राहिल्यास कितीही मोठे संकट आले, तरी ते सहन करण्याचे मनोबल आपल्याला मिळेल !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव