पुणे – नगर जिल्ह्यातील कोतुल गावात सातवाहन कालखंडामधील वसाहतींचे नमुने सापडले असून पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्व विभागाने मुळा नदीपात्रात उत्खनन चालू केले आहे. या उत्खननात ऐतिहासिक ते मध्ययुगीन काळातील आणि शेवटच्या युगातील मानवी संस्कृतीचे, तसेच त्यांचे रहाणीमान दर्शवणारे पुरावे सापडल्याची माहिती पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी दिली. केंद्रीय पुरातत्व विभागाकडून उत्खननाची अनुमती डॉ. साबळे यांच्या नावाने दिली. सातवाहन काळातील मानवी संस्कृती, परंपरा आणि रहाणीमानाचा पुरावा कोतुल गावात असल्याचे संशोधन वर्ष २०१० मध्ये केले होते; मात्र उत्खननाची अनुमती केंद्रीय पुरातत्व विभागाकडून न मिळाल्याने ते उत्खनन पूर्ण करता येत नव्हते. ही अनुमती मिळताच डॉ. साबळे यांनी कळसुबाई शिखरावरून येणार्या मुळा नदीच्या खोर्यात उत्खनन चालू केले. या उत्खननामध्ये त्या काळातील भांडी, बाजारपेठेच्या खुणा, मातीचे आणि काचेचे मणी, समुद्रातील शिंपल्यांपासून बनवलेल्या छोट्या-मोठ्या आकाराच्या बांगड्या, खापराची भांडी, विटा, धान्य साठवण्यासाठी सिद्ध केलेले रांजण, जनावरांचा गोठा, जेवण बनवण्याच्या चुलींसह विविध वस्तू उत्खननात सापडल्या आहेत. उत्खननाचे हे कार्य मे मासाच्या दुसर्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. उत्खननात सातवाहन काळातील बाजारपेठ आणि त्या गावात रहाणार्या लोकांचे रहाणीमान दर्शवणारे पुरावे सापडत आहेत. राज्यातील हे पहिले उत्खनन असून वस्तूंचा अभ्यास केला जात असल्याची माहिती डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे विभागप्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी दिली.