समलिंगी विवाह अयोग्य ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, पीठाधीश्वर, श्रीदत्त पद्मनाभपीठ, कुंडई

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी मार्गदर्शन करतांना

म्हापसा, ३० एप्रिल (वार्ता.) – सर्वाेच्च न्यायालयात सध्या समलिंगी विवाहासंबंधी याचिकेवर सुनावणी चालू आहे. याचा विचार करता आपल्या देशात आदर्श कुटुंब व्यवस्थेची संस्कृती आहे. त्यामुळे समाज बांधला गेला आहे. समाज संघटित ठेवण्यासाठी समलिंगी विवाह संस्कृतीवर घाला घालणे आवश्यक आहे, असे आवाहन कुंडई येथील श्रीदत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांनी केले. खोर्ली, म्हापसा येथील मातृछाया संचलित बालिका कल्याण आश्रमाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी आमदार मायकल लोबो, ‘मातृछाया’ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले, व्यवस्थापकीय संचालक मधुकर दीक्षित, बालविकास कल्याणच्या अध्यक्षा सरिता प्रभु आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी पुढे म्हणाले,

‘‘आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. या जगात जे काही आहे, ते ईश्वराचे आहे आणि त्यामुळे ‘आपल्यास मिळालेले प्रथम देवाला अर्पण करणे’, हा सनातन संस्कृतीचा भाव सतत ठेवला पाहिजे. बालिका कल्याण आश्रमासाठी सर्वांनी झटले पाहिजे.’’ ‘मातृछाया’ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे म्हणाले, ‘‘मातृछाया जात, पात, धर्म न पहाता सर्वांना एकत्र आणत आहे.’’ आमदार मायकल लोबो यांनी या वेळी मातृछायेच्या कार्याचे कौतुक केले.