साधकांना मार्गदर्शन करून घडवणार्‍या पुणे येथील सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

‘पू. (सौ.) मनीषा पाठक यांना अनेक शारीरिक त्रास होत असूनही त्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अखंड अनुसंधानात राहून सतत सेवारत रहातात. त्‍यांना शारीरिक त्रासामुळे साधकांना प्रत्‍यक्ष भेटायला जाता आले नाही, तरी त्‍या भ्रमणभाषवरून साधकांच्‍या अडचणी सोडवतात. त्‍या साधकांना प्रेमाने आधार देऊन सेवेसाठी बळही देतात. साधकांच्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी त्‍या आठवड्यातून ४ दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे या ३ जिल्‍ह्यांतील साधकांसाठी गुरुलीला सत्‍संग घेतात. गुरुलीला सत्‍संगातून मार्गदर्शन घेणार्‍या रत्नागिरी येथील सौ. दीपा औंधकर यांना पू. (सौ.) मनीषाताईंचे जाणवलेले वैशिष्‍ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. तत्‍परता

‘पू. (सौ.) मनीषा पाठक पुष्‍कळ व्‍यस्‍त असूनही त्‍या मी पाठवलेल्‍या प्रत्‍येक लघुसंदेशाला त्‍वरित उत्तर देतात.

२. प्रीती

माझी मुलगी कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे) हिचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आलेले लेख वाचून पू. मनीषाताई तिचे नेहमी कौतुक करतात. त्‍यातून मला त्‍यांच्‍यातील प्रीती अनुभवता येते.

३. वाणीतील चैतन्‍य !

पू. मनीषाताईंनी गुरुलीला सत्‍संगात साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचे नियोजन करायला सांगितल्‍यावर माझ्‍याकडून लगेच नियोजन केले गेले. मला त्‍यांच्‍या सांगण्‍यात आर्तता जाणवून ‘त्‍यांनी सांगितलेले सूत्र माझ्‍या अंतर्मनात पोचले’, असे जाणवले. त्‍या ‘बोले तैसा चाले । त्‍याचीं वंदीन पाउलें ॥’, या संत तुकाराम महाराज यांच्‍या उक्‍तीप्रमाणे ‘आधी कृती करतात आणि नंतर इतरांना सांगतात’, असे मला वाटले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वाणीत चैतन्‍य जाणवते.

४. साधकांना आधार वाटणे

सर्व साधकांना पू. मनीषाताईंचा आधार वाटतो. ‘कुठलाही कठीण प्रसंग असला, तरी पू. मनीषाताईंशी बोलल्‍यावर हलकेपणा जाणवतो’, हे मी अनुभवले आहे.

५. कर्तेपणा नसणे

पू. मनीषाताईंमध्‍ये कर्तेपणाचा लवलेशही नाही. त्‍या सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असल्‍यामुळे कधीच स्‍वकौतुक सांगत नाहीत. त्‍यांच्‍या प्रत्‍येक वाक्‍यामध्‍ये शरणागती अनुभवता येते. त्‍या प्रत्‍येक कृती गुरुचरणी अर्पण करतात.

६. समष्‍टीभाव वाढवण्‍याची प्रेरणा मिळणे

‘पू. मनीषाताईंमधील समष्‍टीभाव पाहून मला ‘समष्‍टी सेवेत सहभागी व्‍हावे, समष्‍टीभाव आणि नेतृत्‍व गुण वाढवावा’, अशी प्रेरणा मिळते. मी पू. मनीषाताईंकडून अनेक गोष्‍टी शिकायचा प्रयत्न करते. मला त्‍यांच्‍या सत्‍संगात गुरुदेवांचे अस्‍तित्‍व अनुभवता येते.

सौ. दीपा औंधकर

७. पू. मनीषाताई घेत असलेला गुरुलीला सत्‍संग !

जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें ।
शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ – दासबोध, दशक १९, समास १०, ओवी १४

अर्थ : आपल्‍याला जे ठाऊक असते, ते हळूहळू इतरांना शिकवावे. अशा प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे.

समर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या वरील उक्‍तीप्रमाणे पू. (सौ.) मनीषाताई गुरुलीला सत्‍संगातून आम्‍हा साधकांमध्‍ये साधना आणि गुरुसेवा करण्‍याची तळमळ वाढवत आहेत.

८. गुरुलीला सत्‍संगातून साधिकेच्‍या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍या पू. (सौ.) मनीषाताई !

८ अ. पू. (सौ.) मनीषाताईंनी केलेल्‍या मार्गदर्शनातून साधिकेच्‍या मनात सेवेच्‍या आयोजनाविषयी असलेल्‍या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे : एकदा मला एका सेवेचे आयोजन करण्‍याची संधी मिळाली. मला ही सेवा मिळाली, तेव्‍हा मला पू. मनीषाताईंची तीव्रतेने आठवण झाली. माझ्‍या मनात ‘आयोजनाची सेवा करतांना ‘सेवेचे चिंतन कसे करावे ? भाव कसा ठेवावा ? साधनेचे प्रयत्न कसे करावे ?’, असे प्रश्‍न होते. यासाठी ‘पू. मनीषाताईंचे मार्गदर्शन घ्‍यावे’, असे मला वाटत होते; पण ‘त्‍यांचा अमूल्‍य वेळ घेणे योग्‍य नाही’, असे वाटून मी त्‍यांना लघुसंदेश किंवा भ्रमणभाष करणे टाळले. त्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी सकाळी गुरुलीला सत्‍संग होता. त्‍या सत्‍संगात पू. मनीषाताईंनी केलेले मार्गदर्शन, म्‍हणजे माझ्‍या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे होती. पू. मनीषाताईंनी गुरुपौर्णिमेच्‍या सेवेच्‍या दृष्‍टीने त्‍याच सर्व सूत्रांवर मार्गदर्शन केले.

८ आ. पू. मनीषाताईंनी ‘सेवा करतांना आध्‍यात्मिक पातळी गाठण्‍यासाठी सेवा न करता सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अनुसंधानात रहाण्‍यासाठी सेवा परिपूर्ण करण्‍याचा प्रयत्न करावा’, असे सांगणे : मला आयोजनाची सेवा मिळाल्‍यावर ‘या सेवेतून ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठण्‍याचे ध्‍येय घेऊया’, असा विचार माझ्‍या मनात आला. नंतरच्‍या गुरुलीला सत्‍संगात पू. मनीषाताईंनी सांगितले, ‘‘६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठण्‍यासाठी सेवा करत आहोत किंवा पातळीच्‍या मागे धावत आहोत, असे न करता श्री गुरूंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) अनुसंधानात रहाण्‍यासाठी सेवा परिपूर्ण करण्‍याचा प्रयत्न करावा.’’

८ इ. कर्तेपणाचे विचार न्‍यून करण्‍याविषयी मार्गदर्शन करणे : माझ्‍या मनात ‘कर्तेपणाच्‍या विचारांवर कशी मात करावी ?’, असे विचार येत होते. गुरुलीला सत्‍संगात पू. मनीषाताईंनी साधकांना स्‍वतःच्‍या मनाच्‍या स्‍थितीचा अभ्‍यास करायला सांगून ‘मी’चे विचार न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करायला सांगितले. त्‍यांनी सत्‍संगात कर्तेपणा न्‍यून करण्‍यासाठी ‘कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयीची सर्व सूत्रे सांगितली.

सत्‍संगातील ही सर्व सूत्रे ऐकतांना ‘पू. मनीषाताई मलाच मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटत होते.

९. ‘संत भगवंताच्‍या सतत अनुसंधानात असल्‍यामुळे ते विश्‍वमनातील विचार ग्रहण करतात’, हे अनुभवणे

गुरुलीला सत्‍संगात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच पू. मनीषाताईंच्‍या माध्‍यमातून माझ्‍या मनात येणारे प्रश्‍न आणि अयोग्‍य विचार यांसाठी मला मार्गदर्शन केले. ‘संत भगवंताच्‍या अनुसंधानात असल्‍यामुळे ते विश्‍वमनातील विचार ग्रहण करतात’, हे मला अनुभवता आले आणि ‘संतांच्‍या माध्‍यमातून भगवंत आपल्‍या समवेतच असतो’, याची प्रचीती घेता आली.

१०. पू. (सौ.) मनीषाताईंचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती असलेला भाव !

पू. मनीषाताई गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ‘देव’ म्‍हणतात. त्‍या स्‍वतःला गुरुदेवांच्‍या पायाचा धुलीकण समजतात. त्‍यांच्‍या प्रत्‍येक शब्‍दांत गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव अनुभवता येतो.

‘हे गुरुदेवा, मला पू. मनीषाताईंकडून अनेक सूत्रे शिकायला मिळत आहेत; मात्र मी शिकायला फार न्‍यून पडत आहे. पू. मनीषाताई म्‍हणजे तुमचेच एक रूप आहे. ‘त्‍यांच्‍याप्रमाणे माझ्‍यातही गुरुकार्याची तळमळ वाढू दे. त्‍यांच्‍यातील गुण मला आत्‍मसात करता येऊ देत’, अशी आपल्‍या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (१२.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक