|
छत्रपती संभाजीनगर – अवकाळी पावसाने गेल्या ४ दिवसांपासून मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे येथे हाहाःकार उडाला आहे. मराठवाडा विभागात गेल्या ४ दिवसांत वादळी वार्यासह गारपीट, अतीवृष्टी आणि मोठ्या पावसामुळे तब्बल १५३ गावांत हानी झाली आहे, तसेच ८ सहस्र हेक्टरवरील पिके आणि फळबागा यांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याखेरीज अंगावर वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. यासह या पावसामुळे १४७ जनावरे, तर १ सहस्र १७८ कोंबड्या दगावल्या आहेत. एकूण ५४ घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती विभागीय प्रशासनाकडून मिळाली.
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पावसाळा आहे की उन्हाळा…https://t.co/vfHyJVOkBU
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2023
मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांतील एकूण १० ‘सर्कल’मध्ये अतीवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ५, धाराशिव २ , बीड २, तर जालना १ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यात लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोल येथे १३५ मि.मी. पाऊस झाला आहे. तांदुळजा ८७.८ मि.मी. किल्लारी ८७.०० मि.मी., हलगरा ६५.०० मी.मी., नागलगाव ८७.७५ मि.मी., तर जालना जिल्ह्यातील तेलानी ७४.५० मि.मी., बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई, पाटोदा तालुक्यात ९१.५० मि.मी., बर्दापूर येथे ६७.७५ मि.मी., धाराशिव जिल्ह्यातील श्रीढोण येथे ६६.२५ मि.मी. आणि नारानगावडी येथे ८७.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.