मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आदिवासी ख्रिस्त्यांकडून तोडफोड !

  • अवैध चर्च पाडल्याच्या विरोधात करत होते आंदोलन !

  • तोडफोड करणारे आदिवासी धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचे सांगितले जात आहे !

घटनास्थळ

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरच्या चुराचांदपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री त्यांच्या सभेच्या ठिकाणी आदिवासी आंदोलकांनी तोडफोड करून आग लावली. हिंसाचार करणार्‍या आदिवासींचे नेतृत्व स्थानिक नेते करत आहेत. हे आदिवासी धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील मणीपूर सरकारच्या निर्णयानुसार आदिवासींसाठी राखीव आणि संरक्षित वनक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आदेशाच्या बहाण्याने राज्य सरकार चर्च पाडत असल्याचा आरोप आदिवासी मंच करत असून धर्मांतरित आदिवासी त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनातून त्यांनी ही तोडफोड केली. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. आता तेथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अवैध बांधकामाच्या आरोपावरून मणीपूर सरकारने ११ एप्रिल या दिवशी इंफाळमधील ३ चर्च पाडली होती. चर्च पाडण्याच्या आदेशाच्या विरोधात मणीपूर उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली होती; परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला.

संपादकीय भूमिका

आधी अवैध चर्च बांधायचे आणि त्यावर कारवाई केली, तर कायदा हातात घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्याक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करायची, यातून धर्मांतरितांचे धाडस किती झाले आहे, हे लक्षात येते ! ही कायदाद्रोही मानसिकता मुळासकट नष्ट करण्यासाठी मणीपूर सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !