पिंपरी (पुणे) महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत प्रकल्प

शाळांमध्ये ‘वायफाय ॲक्सेस’ न दिल्याने ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या १२३ प्राथमिक शाळांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत अद्ययावत ‘ई क्लासरूम’ (संगणकीय वर्गखोली) सिद्ध करण्यात येत आहेत. या अंतर्गत संगणक कक्ष, ‘डिजिटल ई लर्निंग प्लॅटफॉर्म’, ‘वायफाय ॲक्सेस’, एल्.ई.डी. ‘डिस्प्ले’, ‘व्हिडीओ रेकॉडिंग’, ‘शैक्षणिक विश् लेषण सॉफ्टवेअर’, ‘रोबोटिक्स लॅब’ आदी सुविधा देण्यात येणार होत्या; मात्र प्रत्यक्षामध्ये गेल्या साडेतीन वर्षांमध्ये शाळेत अर्धवट काम केल्यामुळे ही योजना बंद स्थितीत आहे. शाळांमध्ये ‘वायफाय ॲक्सेस’ न दिल्याने ‘एच्.डी. कॅमेरे’, ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’, ‘एल्.ई.डी. टीव्ही’ बंद आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये संगणक, विज्ञान आणि गणित यांच्या वर्गखोल्या सिद्ध करण्यात आल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभीचे काही दिवस सोडल्यास अनेक तांत्रिक अडचणींमुळे ‘ई लर्निंग’ सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे. ‘बेनेट कॉलमन’ आणि ‘इडीक सोल्यूशन प्रा.लि.’ यांना ‘बाला आणि ए.आय. बेस्ड एज्युकेशन ॲनॅटिक्स सॉफ्टवेअर’ यंत्रणेची, तसेच ‘ई लर्निंग’ प्रकल्पाची कार्यवाही करण्याची निविदा देण्यात आली होती. २५ मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु कामात दिरंगाई केल्याने त्यांना स्मरणपत्र दिले असून पुढील कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.