पंतप्रधान मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे राज्यभर प्रक्षेपण करणार ! – भाजप

गुजरात आणि महाराष्ट्र दिन कार्यक्रमांचेही आयोजन करणार !

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या रविवारी होणार्‍या १०० व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व मतदारसंघांत करण्याचे आयोजन असल्याची माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. पक्षाच्या येथील मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना डावीकडून दामू नाईक आणि सदानंद शेट तानावडे

३० एप्रिल या दिवशी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासह ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा भाग म्हणून पणजीतील सम्राट थिएटर येथे नव्याने उभारलेल्या सभागृहात महाराष्ट्र आणि गुजरात दिन साजरा करण्यात येणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले. राज्यात पक्षाचे एकूण १ सहस्र ७२२ बूथ आहेत. यांपैकी १ सहस्र २५० बूथवर ‘मन की बात’चे प्रक्षेपण करण्यात येणार असून या कार्यक्रमास पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. पक्षाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील. खासदार विनय तेंडुलकर फोंडा येथे, तर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक पर्वरी येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. पणजीतील मुख्यालयातही हा कार्यक्रम होणार असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

(सौजन्य : MyGov India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक मासाच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमात कोणतीही राजकीय भूमिका मांडली जात नाही किंवा या व्यासपिठाचा राजकारणासाठी वापर केला जात नाही.

देशाच्या कानाकोपर्‍यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती खुद्द पंतप्रधान देशातील नागरिकांना देतात. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी गोव्यातील विकलांगांसाठी केलेल्या ‘पर्पल महोत्सवा’चा उल्लेख केला होता, तसेच रांगोळी कलाकार दत्तगुरु वांतेकर यांचाही उल्लेख केला होता. या रविवारी होणारा कार्यक्रम १०० वा असल्याने संपूर्ण राज्यभर याचे आयोजन केले असल्याचे तानावडे यांनी सांगितले.