गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

फर्मागुडी येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोमंतकियांना आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

फोंडा, १६ एप्रिल (वार्ता.) – मागील लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचा पराजय झाला; मात्र ‘आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपलाच विजयी करणार’, असे आश्वासन मी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आज घेतले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले. या प्रसंगी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा सरकारमधील मंत्रीगण, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘गोवा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून गोव्यातील प्रलंबित खाण प्रश्न सोडवला आहे. पुढील वर्षभरात गोव्यातील खाणी चालू होणार आहेत. काँग्रेसला गोवा हे एक लहान राज्य वाटत असेल; परंतु गोवा हे लहान राज्य नसून ते भारतमातेच्या कपाळावरील ‘टिकली’ आहे. काँग्रेसच्या काळात गोव्याला केवळ ४३२ कोटी रुपये केंद्राकडून मिळाले, तर केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपने गोव्यासाठी ही रक्कम वाढवून गोव्याला ३ सहस्र कोटी रुपये दिले. अटल सेतू, नवीन झुआरी पूल, मोपा आंतराराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम आदी विकासकामांवर सहस्रो कोटी रुपये केंद्रशासनाने खर्च केले आहेत. पुढील १ वर्षात भाजप दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून जनतेसमोर येणार आहे.’’

पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर देशाचा सन्मान वाढवला !

काँग्रेसने नुकतीच ‘भारत जोडो’ यात्रा देशभर काढली; मात्र यात्रेनंतर पूर्वाेत्तर भारतात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्णपणे पराजय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने काश्मीरमधील ३७० कलम हटवले, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला चालना दिली, ‘काशी कॉरिडॉर’ चालू केला, ‘वन्दे भारत’ रेल्वे सेवा चालू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवला आहे.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्याचे कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या अंतर्गत गोवा सरकारने चांगले कार्य केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरिबांचे कल्याण करण्याचा संकल्प पुढे नेतांना ‘जनता तुमच्या दारी’ ही योजना राबवली. याअंतर्गत शासकीय अधिकार्‍यांना लोकांची कामे करण्यासाठी गाव पातळीवर पाठवण्यात आले. असे धाडसी काम करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे.’’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले.

भाजप लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजप लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार आहे. मी गोव्यातील विरोधी पक्षांतील ७ आमदारांना आव्हान देतो की, त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवावी.

वर्ष २०२७ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण देणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फर्मागुडी येथील सभेत बोलतांना केले.

या सभेला भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सभेला उपस्थित जनसमुदाय

अमित शहा यांनी दिली श्री नागेश महारुद्र संस्थानला भेट

फर्मागुडी येथील भाजपच्या प्रचारसभेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागेशी, फोंडा येथील श्री नागेश महारुद्र संस्थानला भेट दिली.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.