केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज फर्मागुडी येथे सभा

लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे वाजणार बिगुल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार !

पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात १६ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता सार्वजनिक सभा होणार असून या सभेची सिद्धता पूर्ण झाली आहे.

याविषयी भाजपचे नेते अधिवक्ता नरेंद्र सावईकर पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती अपेक्षित असून याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार आहे.’’ या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते सिद्धार्थ कुंकळ्ळेकर, भाजपचे गोवा राज्य सचिव सर्वानंद भगत आणि दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक यांची उपस्थिती होती. अधिवक्ता नरेंद्र सावईकर पुढे म्हणाले, ‘‘या सभेद्वारे विशेष करून दक्षिण गोव्यातील लोकसभा जागेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश प्राप्त झाले होते; मात्र त्याचबरोबर देशभरातील १६० लोकसभा जागांवर काही मतांच्या फरकाने भाजपला पराभवही स्वीकारावा लागला. यामध्ये दक्षिण गोवा लोकसभा जागेचाही समावेश आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांत विजय प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा दौर्‍याच्या वेळी पक्षाच्या नेत्यांसमवेत संघटनात्मक बैठकाही घेणार आहेत.’’

डावीकडून,भाजपा गोवा राज्य सचिव व दक्षिण गोवा सह प्रभारी सर्वानंद भगत, पक्षाचे आयटी सेल इन्चार्ज सिद्धार्थ कुंकळकर, माहिती देताना अधिवक्ता श्री नरेंद्र सावईकर व दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक

शहा यांनी म्हादईसंबंधी भूमिका स्पष्ट करावी

‘केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गोवा दौर्‍याच्या वेळी गोमंतकियांसमोर म्हादईसंबंधी भूमिका स्पष्ट करावी’, अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांकडून होत आहे. कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डी.पी.आर्.) केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्यानंतर गोव्यात म्हादई जलवाटप तंट्याचे सूत्र ऐरणीवर आले आहे.

अमित शहा यांच्याशी म्हादई सूत्रावर चर्चा होणार ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

गोवा भेटीवर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी म्हादई जलवाटप तंटा या विषयावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक येथील एका प्रचारसभेत म्हादईसंबंधी घोषणा केली होती. याविषयी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा होणार का ?’, असा एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांनी प्रश्न केला असता मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही माहिती दिली.

फर्मागुडी उड्डाण प्रतिबंधक विभाग घोषित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असलेल्या फर्मागुडी मैदानापासून ५ कि.मी.पर्यंतचे क्षेत्र १६ एप्रिल या दिवशी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत उड्डाण प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या क्षेत्रावरून ‘ड्रोन’ किंवा इतर मानवरहित हवाई वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी ए. आश्विन चंद्रा यांनी हा आदेश काढला आहे.