श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानकच नाही !

भाविक आणि प्रवासी यांचे हाल !

सातारा, ६ एप्रिल (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदवले हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्धीस आले आहे. तेथे महाराजांची समाधीही आहे. श्रीरामनवमीनिमित्त गोंदवल्यात भाविकांची मोठी गर्दी होते. अन्यही वेळी महाराष्ट्रासह परराज्यांतून रामभक्त गोंदवल्याला नेहमी येत असतात; मात्र गोंदवल्यामध्ये भाविकांना ‘बसस्थानक कुठे आहे ?’, हे शोधावे लागते. श्रीक्षेत्र गोंदवल्याला बसस्थानकच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या दहीवडी आगाराचे आणि सातारा विभागाचे श्रीक्षेत्र गोंदवल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फक्त बस थांबा ?

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुसज्ज अशी बसस्थानके आहेत; मात्र श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवासी, भाविक, महिला आणि बालके यांना रस्त्यावरच एस्.टी.च्या गाडीची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे ग्रामपंचायतीने बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने येथे सुसज्ज असे बसस्थानक उभारावे, अशी मागणी भाविक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.