म्यानमारमध्ये सैन्याने लढाऊ विमानातून जमावावर केलेल्या बाँबफेकीमुळे १०० जणांचा मृत्यू

घटनास्थळ

पाजीगी (म्यानमार) – म्यानमारच्या सैन्याने पाजीगी शहरातील सांगेगी प्रांतावर लढाऊ विमानातून बाँबफेक आणि गोळीबार करून केलेल्या आक्रमणात १०० हून अधिक लोक ठार झाले. ११ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. जवळपास २० मिनिटे हे आक्रमण चालू होते. मरणार्‍यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. येथे ‘पीपल्स डिफेन्स फोर्सेस’ (पी.डी.एफ्.) या संघटनेचे कार्यालय उघडले जात असतांना हे आक्रमण करण्यात आले. ही संघटना देशभरात सैन्याच्या विरोधात मोहीम चालवत आहे. आक्रमणाच्या वेळी घटनास्थळी ३०० हून अधिक लोक उपस्थित होते.

हे धक्कादायक चित्र ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांनी सैन्याच्या आक्रमणाचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क म्हणाले की, हवाई आक्रमणाचे वृत्त अस्वस्थ करणारे होते. लढाऊ विमानातून बाँब टाकले, तेव्हा अनेक शाळकरी मुले एका हॉलमध्ये नृत्य करत होती.