कोलेस्ट्रॉल !

आज आपण ‘कोलेस्ट्रॉल’ (रक्तातील महत्वाचा घटक) विषयी जाणून घेणार आहोत. सध्या वाढते कोलेस्ट्रॉल ही फार मोठी समस्या झाली आहे. फार अल्पवयात आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याची उदाहरणे बघायला मिळतात. सर्वप्रथम ‘कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?’ ते आपण जाणून घेऊया.

‘कोलेस्ट्रॉल’ हा आपल्या शरिरात असणारा महत्त्वाचा घटक

१. कोलेस्ट्रॉलचे प्रकार

‘कोलेस्ट्रॉल’ हा आपल्या शरिरात असणारा महत्त्वाचा घटक आहे. तो आपल्या शरिरात यकृतामध्ये निर्माण होत असतो. त्याचे शरिरात अस्तित्वात असणारे (अंतर्गत) आणि अन्नाच्या माध्यमातून शरिरात जाणारे (बाह्य) कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकार असतात.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

२. कोलेस्ट्रॉलचे महत्त्व

अ. प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये ‘कोलेस्ट्रॉल’ असते. पेशी जिवंत रहाण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी ‘कोलेस्ट्रॉल’ साहाय्य करते.

आ. शरिरातील ग्रंथींना त्यांचे ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) निर्माण करण्यासाठी ‘कोलेस्ट्रॉल’चे साहाय्य आवश्यक असते.

इ. मेंदू आणि मज्जासंस्था यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी ‘कोलेस्ट्रॉल’ आवश्यक आहे.

ई. त्वचेखाली ‘कोलेस्ट्रॉल’ काही प्रथिनांच्या समवेत एक आवरण सिद्ध करते. ज्याच्यामुळे शरिरातील पाण्याचे बाष्पीभवन अल्प प्रमाणात होते. अन्यथा शरिरातून बाष्पीभवनाच्या माध्यमातून पुष्कळ पाणी न्यून झाले असते.

३. ‘कोलेस्ट्रॉल’चे आणखी काही प्रकार

‘कोलेस्ट्रॉल’ रक्तातून वाहून नेण्यासाठी त्याच्याभोवती प्रथिनांचे आवरण आवश्यक असते. प्रथिनांच्या घनतेनुसार त्याचे दोन प्रकार आहेत.

अ. एल्.डी.एल्.- लो डेनसिटी (कमी घनता) लिपोप्रोटीन

आ. एच्.डी.एल्.- हाय डेनसिटी (अधिक घनता) लिपोप्रोटीन

४. शरिरातील ‘कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण पालटण्यास कारणीभूत घटक

अ. स्वतःचा आहार : जेव्हा आहारामधून आपल्या शरिरामध्ये कोलेस्ट्रॉल जाते, तेव्हा बाहेरून ‘कोलेस्ट्रॉल’ येत आहे, अशी सूचना लगेच आपल्या शरिराला मिळते. त्यामुळे शरिरात निर्माण होणार्‍या कोलेस्ट्रॉलची निर्मिती थांबवली जाते. त्यामुळे एकूण कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर फार फरक पडत नाही. फार तर १५ ते २० टक्के परिणाम होतो.

आ. आहारातील उच्च-संतृप्त चरबी (हायली सॅच्युरेटेड फॅट्स) शरिरातील ‘कोलेस्ट्रॉल’ चांगलेच वाढवते. शरिरातील चरबी (फॅट्स) ही यकृतामध्ये (‘लिव्हर’मध्ये) साचून रहाते आणि या साठलेल्या चरबीचे कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल न्यून करण्यासाठी आहारातील संतृप्त चरबीयुक्त पदार्थही अल्प करायला हवेत.

इ. आहारातील उच्च असंतृप्त चरबी (हायली सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड) हे रक्तातील ‘कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण बर्‍यापैकी अल्प करते.

ई. शरिरात ‘इन्सुलिन आणि थायरॉईड हार्मोन्स यांची न्यूनताही कोलेस्ट्रॉल वाढवते.

५. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे आवश्यक प्रमाण

अ. ‘एल्.डी.एल्.’ १०० मिलीग्रॅमहून अल्प असावे. कोलेस्ट्रॉल अधिक असेल, तर ते रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण करते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे त्याला ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ असेही म्हणतात.

आ. ‘एल.डी.एल्.’ ४५ मिलीग्रॅमहून अधिक असावे. ते रक्तवाहिन्यांच्या आवरणातील साठलेल्या मेदाला कोलेस्ट्रॉल वाहून नेते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो; म्हणून याला ‘कोलेस्ट्रॉल’ म्हणतात.

प्रतिदिनच्या भोजनामध्ये २७५ मिलीग्रॅमहून अधिक ‘कोलेस्ट्रॉल’ नसावे. खाली कोणत्या पदार्थामध्ये किती मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते, त्याचे प्रमाण दिले आहे.

अ. चिकन : १०० मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

आ. मटण : ६५ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

इ. अंड्याचा बल्क : ४०० मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

ई. भेजाफ्राय : (बकर्‍याच्या मेंदूचे मटन) २ सहस्र मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

उ. गायीचे दूध : १४ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

ऊ. म्हशीचे दूध : १६ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

ए. दोन चमचे तूप : १६ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल

वरील माहितीवरून आपल्याला लक्षात येईल की, भारतातील बहुतांश शाकाहारी लोकांच्या जेवणात २ कप दूध किंवा दुधाचे पदार्थ, तसेच २ चमचे साजूक तूप समाविष्ट केले, तर केवळ ७ ते ७० मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल पोटात जाते. हे प्रमाण २७५ मिलीग्रॅमहून कितीतरी अल्प आहे, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढवण्यात दूध आणि तूप यांहून मांसाहार आणि तेलाचा चुकीचा वापर कारणीभूत आहे.

(सौजन्य : Pancham Ved – Ayurved) 

६. कोलेस्ट्रॉल न्यून करण्यासाठी हे करा !

आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो, त्याचे संतृप्त आणि असंतृप्त चरबीयुक्त पदार्थ, असे दोन प्रकार पडतात. त्यावरून कोणकोणते पदार्थ असतात, ते पुढील माहितीवरून लक्षात येईल. संतृप्त (सॅच्युरेटेड) चरबीयुक्त पदार्थांमध्ये पामतेल, खोबर्‍याचे तेल, केक, बिस्किट, चीज, आईस्क्रिम, मिल्कशेक, चॉकलेट यांचा समावेश होतो. तसेच असंतृप्त (अनसॅच्युरेटेड) चरबीयुक्त पदार्थांमध्ये शेंगदाणे, बादाम, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन, जवस, अक्रोड यांचा समावेश होतो.

अ. आहारात असंतृप्त चरबीयुक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे. स्वयंपाकात खाद्यतेल वापरतांना शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल आणि करडई यांचा आलटून पालटून वापर करायला हवा. तेल ‘रिफाईंड’ न वापरता घाणीचे किंवा ‘डबल फिल्टर’ असे वापरा.

आ. तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळायला हवे. पदार्थ तळण्याऐवजी भाजण्याचा पर्याय निवडा. स्वयंपाक करतांना तेलाचा वापर न्यूनतम करा. तेलाचे आधीच प्रमाण ठरवून तेवढेच वापरा. साधारण ४ माणसांच्या कुटुंबाला प्रतिमास ४ किलो तेल पुरेसे असते.

इ. सर्व बेकरी उत्पादने, सीलबंद अन्न पदार्थ, बाहेरचे तळलेले पदार्थ टाळा; कारण हे पदार्थ डालडा वनस्पती तूप किंवा पामतेल यांनी बनवलेले असतात.

ई. दिवसातून दोनच वेळा भोजन करा. दोन भोजनाच्या मध्ये वरचे वर खाणे टाळा. भूक लागल्यास साळीच्या लाह्या खाऊ शकता.

उ. आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करायलाच हवा. व्यायामाला कोणताच पर्याय नाही. शरिरातील चरबी अल्प करण्यासाठी आपण प्रतिदिन काय स्वयंपाक करायचा, याचे नियोजन करतो, त्याचप्रमाणे व्यायामासाठीही वेळ काढला पाहिजे. प्रारंभी १० मिनिटे व्यायाम करू शकतो. त्यानंतर त्यात हळूहळू वाढ करू शकतो. व्यायाम प्रकारात विविधता ठेवल्यास उत्साह टिकून राहतो.

ऊ. अधिकाधिक कृतीशील रहाण्याचा प्रयत्न करा. दुपारी झोपणे पूर्णपणे टाळले पाहिजे. वयस्कर, आजारी व्यक्ती आणि लहान मुले सोडली, तर इतरांनी दुपारी झोपणे टाळले पाहिजे.

ए. मधुमेह आणि ‘थायरॉईड’ यांची तक्रार असणार्‍या रुग्णांनी त्यांची औषधे नियमितपणे आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) सल्ल्याने घ्यायची आहेत. स्वत:च्या मनाने औषध बंद करणे, तपासणी न करता तेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवणे या गोष्टी टाळायला हव्यात. नियमित तपासण्या करून आधुनिक वैद्यांकडून योग्य त्या मात्रेतील औषधे घ्यायला हवीत.’

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे.

(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’ यूट्यूब वाहिनी)