केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे निर्देश !
नाशिक – गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयआयटी पवई यांच्या साहाय्याने उपाययोजना करण्याचे नियोजन करत आहे. गोदावरी नदी प्रदूषित करणार्यांवर थेट कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. १० एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड-१९, जलयुक्त शिवार अभियान, गोदावरी प्रदूषण नियंत्रण आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांची हानी अन् पंचनामे याविषयी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. पवार बोलत होत्या. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील कोरोनाच्या अनुषंगाने खाटा आणि ऑक्सिजन यांचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे, तसेच कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी चाचणी लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स’ चालू करण्याचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला निधी सोयीसुविधांच्या अनुषंगाने लवकरात लवकर खर्च करण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
संपादकीय भूमिकागोदावरी नदी प्रदूषित करणार्यांवर थेट कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन प्रशासनाने करणे आवश्यक ! |