छत्रपती संभाजीनगर – कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांची माहिती, तसेच इतर माहिती संकलित करण्याचे दायित्व असलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले; पण आता लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन भ्रमणभाषसंच देण्याच्या हालचाली चालू झाल्या असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती संंबंधित सूत्रांकडून देण्यात आली.