भारताची घोडदौड !

वर्ष १९६० पूर्वी विदेशात विशेषतः अमेरिकेत भारताविषयीची संकल्पना म्हणजे ‘विचित्र देवता असणारा देश’, अशी होती. ७० ते ९० च्या दशकांत भारतातील शास्त्रज्ञ, आधुनिक वैद्य, अभियंते, व्यापारी विदेशात स्थायिक होऊन तेथील विविध क्षेत्रांत सहभागी झाले. वर्ष २००० नंतर हे प्रमाण प्रचंड वाढले. मागील २ दशकांमध्ये भारतातील योग आणि आयुर्वेद यांचे आकर्षण वाढून विदेशी त्याचा झपाट्याने अंगीकार करू लागले. गेल्या काही वर्षांत ‘भारतातील प्राचीन विज्ञान संपूर्ण जगातील आधुनिक विज्ञानापेक्षा प्रगत होते’, हे विविध उदाहरणांतून विदेशी मंडळीही मोठ्या प्रमाणात सांगू लागली. वर्ष २०२१ नंतर भारताची आर्थिक घोडदौड प्रचंड वेगाने होत असल्याची चर्चा जागतिक स्तरावर चालू झाली. कोरोनानंतर जगभरात आलेल्या मंदीनंतर भारताचा वाढता ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) पहाता संपूर्ण जग एक ‘ग्लोबल प्लेअर’ (आर्थिक क्षेत्रातील खेळाडू) या दृष्टीने भारताकडे पहात आहे.

ही सर्व पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे भारत दौर्‍यावर असलेल्या युक्रेनच्या विदेशमंत्री एमीन झापरोवा यांनी भारताच्या सक्षमतेविषयी त्याचे गुणगान गाऊन त्याच्याकडून अनेक मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षांमध्ये ‘भारताने युक्रेनला साहाय्य करावे’, असा छुपा संदेश असला, तरीही त्यातून जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांमध्ये वाढलेले भारताचे महत्त्व लक्षात आल्याविना रहात नाही. झापरोवा यांनी ‘विश्वगुरु’ हा शब्द भारतासाठी वापरला, तो केवळ भारताच्या उभरत्या अर्थव्यवस्थेला उद्देशून नव्हे, तर जगभर युद्धाचे वातावरण असतांना भारत सदैव घेत असलेल्या ‘न्याय्य’ भूमिकेमुळे ! ‘युक्रेनसारख्या देशांना कुठेतरी भारताकडून साहाय्याची अपेक्षा आहे आणि कुठेतरी भारताचा आधारही त्यांना वाटतो’, असे म्हणण्यास वाव आहे. झापरोवा यांनी म्हटले की, ऊर्जा क्षेत्राप्रमाणेच सैन्यासारख्या क्षेत्रातही भारताने जगात देवाण-घेवाण केली पाहिजे. भारताने जगभरात आर्थिक आव्हाने घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. हे करणे किंवा न करणे हा एक वेगळा भाग राहील; पण ही अपेक्षा अन्य देश करत आहेत, अशी स्थिती जागतिक स्तरावर भारताने सध्या निर्माण केली आहे.

परराष्ट्रमंत्र्यांचा आदरयुक्त दरारा

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

गेल्या काही मासांमध्ये परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी विदेशनीतीमध्ये घेतलेली कणखर भूमिका ही भारताविषयी इतरांच्या मनात आदर निर्माण करणारी ठरत आहे. ‘भारताचे प्रत्येक देशासमवेत स्वतंत्र संबंध असतील. कुणाच्या दबावामुळे भारत अन्य देशांशी संबंध ठेवण्यास कचरणार नाही’, असा संदेश सध्या सर्व जगामध्ये गेला आहे. पूर्वी अनेक वर्षे अमेरिकेचा आपल्यावर प्रत्यक्ष आर्थिक दबाव होता. भारत तटस्थ देश असला, तरी या दबावामुळे अणूसंशोधन आणि संबंधित गोष्टींसाठी भारताला दबून रहावे लागत होते. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर जयशंकर यांनी पाकिस्तान, चीन, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेशी संबंध, आतंकवाद अशा सूत्रांवर भारताची बाजू परखडपणे मांडली आहे. ‘भारताचा अवमान करण्याचे, भारताला दाबण्याचे दिवस आता संपले आहेत’, असे त्यांनी वेगवेगळ्या घटनांच्या वेळी केलेल्या वक्तव्यांतून सिद्ध केले आहे. त्यामुळे सध्या जागतिक स्तरावर भारताची भूमिका ही ‘दबावाखाली राहू शकतो’ असा देश’, अशी नसून ‘जशास तसे उत्तर देऊ’ किंवा ‘मुत्सद्देगिरीने फासे पलटवू’, अशा स्वरूपाची काहीशी झाली आहे. मानवाधिकाराच्या संदर्भात चर्चा झाल्यास ‘आम्ही गप्प बसणार नाही. आम्हालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील’, असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले होते. शत्रूराष्ट्र दबकून वागतील, अशी स्थिती एस्. जयशंकर यांनी सध्या निर्माण केली आहे.

निर्मला सीतारामन् यांचे पावलावर पाऊल

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतविरोधी वातावरण निर्माण करणार्‍या पत्रकारांना आव्हान केले की, त्यांनी भारतात यावे आणि कुठे अल्पसंख्यांकांवर अन्याय होतो, हे दाखवावे. मी स्वतः त्यांचे यजमानपद स्वीकारीन. भारतात न येता वार्तांकन करणार्‍यांचा उल्लेख करून त्यांना अत्यंत रोखठोकपणे सुनावले की, भारतातील मुसलमानांवर अन्याय झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगात २ क्रमांकाची मुसलमान लोकसंख्या असलेल्या भारतातील मुसलमानांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. याउलट पाकिस्तानात हिंदूंची स्थिती दुर्दैवी आहे आणि मुसलमानही आपापसांत भांडत आहेत. विश्व व्यापार संघटनेला (डब्ल्यू. टी. ओ.)ही त्यांनी ‘अन्य देशांचेही ऐकून घ्या आणि सर्व देशांप्रती निष्पक्ष रहा’, असे सुनावले आहे. महासत्ता अमेरिकेला त्यांच्याचकडे जाऊन भारत आता असे ऐकवू शकतो, एवढा तो सामर्थ्यशाली बनला आहे.

भारताची आर्थिक प्रगती जगात तिसर्‍या क्रमांकावर असल्याने, तसेच भारतातील बहुसंख्यांकांना त्याच्या प्राचीन गौरवशाली प्रगत इतिहासाचे भान जागृत होत असल्याने, त्याचे खच्चीकरण करण्यासाठी भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शक्तींनी भारताच्या संदर्भात कथित मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याविषयी, कट्टरतावाद वाढत असल्याविषयी धादांत खोटी सूत्रे उपस्थित करून त्याची प्रतिमा डागळण्याचे मोठे षड्यंत्र रचले आहे. भारत त्याला पुरून उरत आहे. ‘भारतातील विरोधी पक्षाच्या सदस्यांना पद सोडावे लागत आहे. भारतातील मुसलमानांना मारले जात आहे’, अशा प्रकारच्या वावड्या तेथील माध्यमांतून उठवल्या जात आहेत. निर्मला सीतारामन् यांनी सडेतोडपणे अमेरिकी पत्रकारांसमोर जाऊन मांडलेली भारताची बाजू त्यांच्यासह भारतातील हिंदुद्वेष्ट्यांनाही एक चपराकच आहे. त्यांच्या या स्पष्टवक्त्या भूमिकेमुळे एका दगडात अनेक पक्षी मारले गेले आहेत. राष्ट्रप्रेमींनाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे. जागतिक स्तरावरील हे वैचारिक युद्ध लढण्यासाठी भारताच्या लोकप्रतिनिधींना ईश्वर अशीच शक्ती आणि प्रेरणा देवो अन् भारताची सर्व स्तरांतील घोडदौड चालू राहून भारत लवकर विश्वगुरु बनो, हीच प्रार्थना !

सर्व स्तरांवर चालू झालेली भारताची घोडदौड भारताला एक दिवस विश्वगुरु बनवेल !