मुंबई – सध्या मुंबई शहर देहलीपेक्षाही सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखले जात आहे. यावर प्रतिबंध म्हणून येथे १९ ‘प्युरिफिकेशन युनिट’ (शुद्धीकरण प्रकल्प) बसवले जाणार आहेत. त्यासमवेत धुक्याचे १४ मनोरेही (स्मॉग टॉवर्स) उभारण्यात येणार आहेत. या मनोर्यांच्या सभोवतालची हवा काही प्रमाणात शुद्ध होऊ शकते. हे यंत्र लावलेल्या भोवतालची हवा यात शोषली जाऊन शुद्ध हवा त्यातून बाहेर सोडली जाते. हवेतील धूलिकण, विषारी वायू प्रदूषित हवेतून वेगळे होऊन शुद्ध हवा बाहेर पडते.
‘मुंबईतील वाढती लोकसंख्या पहाता या मनोर्यांचा तितकासा परिणाम होऊ शकणार नाही. प्रदूषणाच्या उगमस्थानांच्या ठिकाणीच प्रदूषणाला रोखता आले, तर ते जास्त साहाय्याचे ठरेल’, असे मत प्रकृती एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. देहलीत प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेला प्रयत्न अपयशी ठरला असतांना मुंबईमध्ये असा प्रयत्न करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणे अयोग्य आहे’, असेही मत काही तज्ञांनी मांडले आहे.