आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील मारुति नवसाला पावणारा असल्याने सहस्रो भाविक दर्शन घेण्यासाठी आज निमणी येथे येत असतात. हनुमान जयंती येथे मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. या निमित्ताने आज येथील मंदिर आणि यात्रा यांची माहिती घेऊया ! संकलक – श्री. शंकर राजमाने
पुरातन मंदिर
हनुमान हे निमणी गावचे ग्रामदैवत, नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. हे पुरातन मंदिर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या काळात बांधले गेले आहे. त्या वेळी हे मंदिर दगड, माती, लाकडी खांब आणि कौलारू पद्धतीचे होते. अलीकडच्या ३० वर्षांच्या कालावधीत या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या कळसाची हेमाडपंथीय पद्धतीने उभारणी पूर्ण झाली आहे. दोन्ही मंदिरांचा कळसारोहण सोहळा पार पडलेला आहे.
या मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती पाषाणाची आणि सन्मुख असून साडेतीन फूट उंचीची आहे. या मंदिरात सर्पदंशावर प्रभावी उपाय केला जातो. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या मंदिरात आणले जाते आणि मंदिरासमोर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाच्या पाल्याचा रस तिला पाजला जातो. ‘या उपचारानंतर सर्पदंश उतरतो’, असा अनेकांचा अनुभव असून भाविकांची तशी श्रद्धा आहे.
यात्रेचे स्वरूप !
निमणी येथे सुमारे २३० वर्षांपासून चैत्र पौर्णिमेस हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा भरते. या दिवशी अभिषेक, प्रसाद वाटप आणि रात्री पालखी, असे मुख्य कार्यक्रम होतात. या सर्व कार्यक्रमांना भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या रात्री १ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत मूर्तीस अभिषेक आणि स्नान घातले जाते. त्याचप्रमाणे पहाटे ४ वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत भजनाचे कार्यक्रम होतात. सूर्योदय होताच मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते. त्यानंतर प्रसाद वाटप केले जाते. या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंबील आणि नैवैद्य मंदिरात आणला जातो. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत गावातील प्रत्येक गल्लीत वाजत-गाजत साखर आणि पेढे मंदिरस्थळी आणून भाविकांना वाटले जातात. या रात्री पालखी निघते. पालखीचे मानकरी कै. कुशाबाजी नागोजी पाटील यांच्या घरातून पालखी देवालयात आणली जाते. ही पालखी रात्री ११ वाजल्यापासून १ वाजेपर्यंत चालते. पालखीचे स्वरूप !
पालखीचा प्रारंभ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कै. कुशाबा नागोजी पाटील यांनी ‘मला मूल होऊ दे, तुझ्या दारातून पालखी फिरवतो’, असा नवस बोलला होता. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली. तेव्हा त्यांनी उत्साहात पालखीचा प्रारंभ केला. त्या वेळेपासून आजपर्यंत यात्रेच्या दिवशी लहान मुले पालखीला आडवी घालतात. पालखीचे मानकरी त्या मुलाला पायाचा स्पर्श करून पुढे जातात, अशी प्रथा आहे.
कै. कुशाबा पाटील यांचे वंशज गावात यात्रा भरवण्यात पुढाकार घेतात आणि यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. सध्या निमणी गावाचे माजी उपसरपंच आणि कै. कुशाबा यांचे वंशज श्री. रवींद्र दादासाहेब पाटील हे वर्ष २००० पासून यात्रा समितीचे प्रमुख आहेत.