‘उप’जीविका ‘मुख्य’ नाही !

मराठीमध्ये नोकरीधंद्याला, म्हणजे अर्थार्जन करण्याला ‘उपजीविका’ असे म्हणतात. उदाहरणार्थ ‘शेती हे त्याच्या उपजीविकेचे साधन आहे’, असे आपण म्हणतो. याचा अर्थ शेतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा उदरनिर्वाह चालतो. त्याला ‘मुख्यजीविका’ अथवा ‘प्रमुखजीविका’ असे म्हटलेले नाही. याचा अर्थ जीवन जगण्यासाठी उपजीविकेला ‘उप’ एवढेच महत्त्व आहे; मात्र आज उपजीविका अर्थात् नोकरीधंदा यांना मुख्याहून मुख्य स्थान मिळाले आहे. ‘उप’ म्हणजे तुलनेने अल्प (कमी) महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीसाठी सध्या अनेक लोकांचा जीवनातील उणे-अधिक ८० टक्के वेळ वापरला जातो !  मनुष्यजन्माचा खरा उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. ईश्वरप्राप्ती करण्यासाठी साधना अनिवार्य आहे. मनुष्यजन्माच्या खर्‍या उद्देशपूर्तीसाठी अधिकाधिक वेळ वापरला जाणे आवश्यक असतांना उपजीविकेसाठी अधिकाधिक वेळ दिला जात आहे.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. यांतील ‘धर्म आणि मोक्ष हे पुरुषार्थ साध्य करण्यासाठी खर्‍या अर्थाने प्रयत्न करायचे असतात, तर अर्थ आणि काम हे पुरुषार्थ प्रारब्धाने मिळतात’, असे म्हणतात. आज मात्र स्थिती उलट दिसते. धर्म आणि मोक्ष हे पुरुषार्थ देवावर सोडून जे प्रारब्धाधीन आहेत, अशा अर्थ आणि काम या पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. पैसा कमवण्यात मनुष्याचा खरा कस नसून धर्माचरण करण्यात, तसेच मोक्ष साध्य करण्यात आहे.

या गोष्टी लक्षात घेऊन मनुष्याने त्याचा वेळ सत्कारणी लावावा. अनेकांची पैशांच्या मागे धावतांना एवढी दमछाक होते की, तरुण वयातच अनेक व्याधी जडतात. मृत्यूनंतर पैसे आपल्यासह येत नाहीत, तर आपली साधनाच येते. हे लक्षात घेऊन स्वतःच्या वेळेचे नियोजन करावे. नाही तर आयुष्यातील महत्त्वाची वर्षे उपजीविकेच्या साधनांमध्येच व्यय झाल्याने जे साध्य करायचे होते ते राहिले, असे होणार. ना कुठला छंद जोपासता आला, ना कुटुंबियांना वेळ देता आला, ना समाजासाठी काही चांगले करता आले, ना देवा-धर्मासाठी वेळ दिला गेला, असे व्हायला नको. त्यासाठी ‘उप’जीविका ही ‘मुख्य’जीविका नाही, हे लक्षात घेऊया.

– सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा.