गौरव यात्रेला मिळालेला प्रतिसाद सावरकर विरोधकांना चपराक !
सावंतवाडी – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा त्याग, बलीदान, देशभक्ती यांचे स्मरण करून ३ एप्रिल या दिवशी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत सावरकरप्रेमींनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘मी सावरकर’, असे लिहिलेल्या भगव्या टोप्या घातल्या होत्या, तर ‘आम्ही सर्व सावरकर’, असे फलक हातात घेतले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषामुळे सावंतवाडी शहर दुमदुमून गेले होते.
येथील भाजप कार्यालयाकडून या यात्रेचा प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात निघालेली ही यात्रा पंचम खेमराज महाविद्यालय, मिलाग्रीस हायस्कूल, सबनीसवाडा, मुख्य बाजारपेठ मार्गे गांधीचौक येथे आल्यावर फेरीची सांगता झाली. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या यात्रेत भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक दळवी, शहराध्यक्ष नारायण राणे यांच्यासह या यात्रेत शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवास्थानाहून शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप
यात्रेच्या सांगतेच्या वेळी तेली म्हणाले, ‘‘यात्रेत हिंदूंनी दाखवलेला सहभाग विरोधक आणि सावरकर यांच्यावर टीका करणार्यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही.’’
स्वा. सावरकर यांच्यावर टीका करणार्यांचा निषेध ! – अशोक दळवी, जिल्हाप्रमुख, शिवसेना
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी दिलेले बलीदान पहाता आजची ही यात्रा म्हणजे त्यांचा गौरव आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली, त्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.