दापोली येथील सौ. प्रार्थना गुजराथी यांना नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

सौ. प्रार्थना गुजराथी

१. नामजप करतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून चरणांशी घेतले आहे’, असे जाणवणे आणि ‘तो आनंदाचा क्षण संपूच नये’, असे वाटणे

‘२६.१.२०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजता मी ध्‍यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्‍या वेळी देवानेच माझ्‍याकडून भावपूर्ण नामजप करवून घेतला. तेव्‍हा ‘मी एक लहान मूल झाले आहे’, असे मला वाटले. एखादे लहान मूल हरवल्‍यावर त्‍याला त्‍याची आई भेटली, तर ते आईला जाऊन बिलगते आणि आई त्‍याला आनंदाने पोटाशी धरते. ती त्‍याचे डोके आणि पाठ यांवरून वात्‍सल्‍याने हात फिरवते, त्‍याचप्रमाणे ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सूक्ष्मातून त्‍यांच्‍या चरणांशी घेतले आहे’, असे मला जाणवले. ‘तो क्षण संपूच नये’, असे मला वाटत होते. त्‍या वेळी माझ्‍याकडून गुरुदेवांना प्रार्थना होत होती, ‘मला आता तुम्‍हाला सोडून कुठेच जायचे नाही.’

२. क्षणभर भगवंत भेटल्‍यासारखे वाटणे

त्‍या क्षणी मला संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या अभंगातील पुढील ओळी आठवल्‍या, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्‍ति चारी साधियेल्‍या ॥’ , म्‍हणजे ‘देवाच्‍या दारापाशी मनुष्‍य क्षणभर जरी उभा राहिला, तरी चारही मुक्‍ती साधल्‍याप्रमाणे आहे.’

त्‍या क्षणी ‘भगवंत भेटला’, असेच मला वाटत होते. त्‍या वेळी मला जो आनंद मिळाला, त्‍याचे वर्णन मी करू शकत नाही. ‘क्षणभर जरी देवाचे दर्शन झाले, तरी चारही मुक्‍ती मिळाल्‍यासारखे आहे’, हे जे संतांनी सांगून ठेवले आहे, ते मला क्षणभर अनुभवता आले.

३. भगवंत ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले ईश्‍वर आहेत’, याची अनुभूती देत असल्‍याचे जाणवणे 

त्‍या दिवशी मी नामजप करत असतांना आलेल्‍या अनुभूतीचा उलगडा मला दुसर्‍या दिवशी झाला. दुसर्‍या दिवशी माझ्‍या लक्षात आले, ‘जसे द्वापरयुगात भगवान श्रीकृष्‍णाने गोपगोपींना ‘तोच ईश्‍वर आहे’, याची अनुभूती दिली होती, तसेच आता भगवंत ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर ईश्‍वर आहेत’, याची अनुभूती देत आहे’, असे मला वाटले.

‘माझी काहीच पात्रता नसतांना भगवंताने मला ही अनुभूती दिली’, यासाठी मी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

 – सौ. प्रार्थना गुजराथी, दापोली, जिल्‍हा रत्नागिरी. (६.२.२०२२)

  • सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक