श्रीरामनवमीनिमित्त घेतलेल्‍या भावप्रयोगांमुळे साधिकेमध्‍ये झालेले पालट

प्रत्‍येकामध्‍ये भाव निर्माण व्‍हावा आणि भाववृद्धी व्‍हावी’, यासाठी वर्ष २०२१ मधील गुढीपाडव्‍यापासून श्रीरामनवमीपर्यंत प्रत्‍येक सेवा आढाव्‍यानंतर दायित्‍व असणारी साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यास सांगितले. त्‍यात प्रतिदिन एकेकाला भावजागृतीचा प्रयोग घेण्‍याची संधी मिळाली. त्‍यामुळे मला झालेले लाभ येथे दिले आहेत.

कु. मयुरी राजेंद्र आगावणे

१. देवाशी अनुसंधान वाढणे

माझ्‍याकडून भावजागृतीचा प्रयोग, तसेच देवाशी अनुसंधान फार अल्‍प व्‍हायचे. या प्रयोगामुळे देवाशी अनुसंधान आणि मी भावस्‍थितीत रहाणे यांत वाढ झाली.

२. नकारात्‍मकता अल्‍प होण्‍यास साहाय्‍य होणे

माझी भावजागृती फार अल्‍प व्‍हायची. मला भावस्‍थिती अनुभवता यायची नाही. त्‍यामुळे ‘माझ्‍यात भाव नाही; म्‍हणून मला भावस्‍थिती अनुभवता येत नाही’, अशी नकारात्‍मकता निर्माण झाली होती. आता जे काही भावजागृतीचे प्रयोग घेतले जातात, त्‍यातून मला भाव अनुभवता येत आहे. माझे मन आधीच्‍या तुलनेत आनंदी झाले आहे.

३. भावस्‍थितीत राहिल्‍याने मनातील पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया येणे अल्‍प होणे

सध्‍या होत असलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांमुळे जेव्‍हा मन भावस्‍थितीमध्‍ये असते, तेव्‍हा केवळ भावस्‍थिती आणि देवाचे स्‍मरण इतकेच माझ्‍या लक्षात रहाते. मनात असलेल्‍या प्रतिक्रिया आणि पूर्वग्रह यांचा मला विसर पडतो. एके दिवशी एका साधिकेविषयी पूर्वग्रह आणि प्रतिक्रियांचा भाग मनामध्‍ये उफाळून आला होता. त्‍या दिवशी झालेल्‍या भावप्रयोगानंतर ‘स्‍वभावदोषांमुळे मी वेळ आणि ऊर्जा वाया घालवत आहे’, याची मला जाणीव झाली. त्‍या साधिकेबद्दलचे अयोग्‍य विचारही अल्‍प झाले.

४. पूर्वीच्‍या तुलनेत मन स्‍थिर असल्‍याचे लक्षात येणे

गेल्‍या काही दिवसांपूर्वी ‘मनाची अस्‍थिरता वाढल्‍याने निराशा आली होती; परंतु आता निराशा पुष्‍कळ अल्‍प होऊन सेवा आणि शिकणे यांतील आनंद घेता येत आहे.

५. भावप्रयोगाच्‍या वेळी त्रासदायक आवरण नष्‍ट होऊन परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

श्रीरामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर भावजागृतीचा प्रयोग घेत असतांना ‘माझ्‍या मनावरील आवरण हळूहळू अल्‍प होत आहे आणि माझे मन स्‍थिर होत आहे’, असे मला वाटले. नंतर मला एक काळा गोळा दिसला. जसजसे ताई भावप्रयोग सांगत होती, तसतसे ‘त्‍या काळ्‍या गोळ्‍यावरील आवरण, म्‍हणजे त्‍यातील त्रासदायक शक्‍ती अल्‍प होत आहे आणि तो तेजस्‍वी होत आहे’, असे मला दिसले. नंतर ‘त्‍या गोळ्‍यांमध्‍ये पूर्ण रामनाम भरले गेले आहे’, असे मला दिसले. त्‍यानंतर ‘आता मला काहीच नको, केवळ देवच हवा’, असे विचार मनामध्‍ये दाटून आले. मला देवाची आठवण येऊन माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. मला श्रीरामाचे, म्‍हणजेच परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले.

‘हे गुरुमाऊली, आमची पात्रता नसतांनाही तुम्‍ही आम्‍हाला भरभरून देत आहात. कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरीही हे ऋण आम्‍ही फेडू शकत नाही. तुमच्‍या कृपेस पात्र होण्‍यासाठी तुम्‍हीच आमच्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित अशी कठोर साधना करवून घ्‍या’, अशी प्रार्थना आहे.’

– कु. मयुरी आगावणे, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.४.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक