राज्‍यात शिष्‍यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्‍च शिक्षण सहसंचालकांची माहिती

उच्‍च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर

पुणे – ‘महाडीबीटी’ या संकेतस्‍थळावरील शिष्‍यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्‍यांनी ऑनलाईन अर्ज केल्‍यानंतर त्‍याची पडताळणी महाविद्यालयात होते; मात्र त्‍यानंतरही शिष्‍यवृत्ती अर्ज प्रलंबित रहात आहेत. गेल्‍या ४ वर्षांमध्‍ये १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित राहिले आहेत, अशी माहिती उच्‍च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. विद्यार्थ्‍यांचे शिष्‍यवृत्ती अर्ज प्रलंबित न ठेवण्‍याच्‍या सूचना उच्‍च शिक्षण विभागाने शिक्षण संस्‍थांना दिल्‍याचे समजते.

विद्यार्थ्‍यांच्‍या शिष्‍यवृत्ती अर्जावर प्रतिदिन कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांना दुसर्‍या हप्‍त्‍याच्‍या शिष्‍यवृत्ती लाभ देण्‍यासाठी संबंधित विद्यार्थ्‍यांच्‍या शिष्‍यवृत्ती अर्जाची महाविद्यालय स्‍तरावर पडताळणी होणे आवश्‍यक आहे. प्रलंबित अर्जांमुळे संबंधित विद्यार्थ्‍यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्‍या शिष्‍यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. त्‍यामुळे सर्व अर्जांची वेळेत पडताळणी होणे आवश्‍यक आहे. पडताळणी अभावी प्रलंबित अर्जासमवेत भविष्‍यात उद़्‍भवणार्‍या अडचणींना संबंधित विद्यापिठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्यांचे दायित्‍व असेल, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.