गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

अर्थसंकल्प २९ मार्च या दिवशी मांडणार

(चित्र सौजन्य PRUDENT MEDIA GOA)

पणजी, २६ मार्च (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या चार दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २७ मार्चपासून प्रारंभ होत आहे. २७ ते ३१ मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ३० मार्च या दिवशी श्रीरामनवमीची सुटी असेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्री या नात्याने २९ मार्च या दिवशी राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनात एकूण तारांकित २०७ आणि अतारांकित ५९६ मिळून ८०३ प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

अधिवेशनामध्ये म्हादईचा पाणीवाटप प्रश्न, म्हादई अभयारण्य आणि इतर वनक्षेत्र यांना आग लागणे, कळंगुट समुद्रकिनारपट्टीतील खंडणी प्रकरण, अटल सेतू बंद झाल्याने झालेला वाहतुकीचा खोळंबा, पणजी शहरातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या, गोव्याला पडलेला अमली पदार्थांचा विळखा आदी प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.