त्रेतायुगात ब्रह्मदेवाने केलेली ‘नाट्यशास्त्रा’ची उत्पत्ती आणि कलियुगात ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ यादृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

आज २७ मार्च २०२३ या दिवशी असलेल्या ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने…

नाट्यशास्त्राच्या निर्मितीमागील उदात्त हेतू समजून घेऊन आध्यात्मिक उद्बोधनासाठी त्याचा वापर करायला हवा !

१. नाट्यशास्त्राची उत्पत्ती आणि त्यामागील ब्रह्मदेवाचा उद्देश लक्षात घेऊन भरतमुनींनी समाजाला कलेच्या माध्यमातून ईश्वराशी जोडणे

सौ. शुभांगी शेळके

१ अ. ब्रह्मदेवाने इतिहासासह ‘नाट्यशास्त्र’ नावाच्या वेदाची निर्मिती करणे : ‘नाट्यशास्त्रानुसार वैवस्वत मन्वंतराच्या त्रेतायुगाच्या प्रारंभी लोक काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, सुख आणि दुःख यांमध्ये बुडून गेले होते. तेव्हा इंद्रादी देवांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, ‘हे भगवन्, अशा स्थितीतून विश्वाला बाहेर काढण्यासाठी आणि ‘वेदांचे महत्त्व लोकांना पुन्हा कळावे’, यासाठी दृश्य अन् श्राव्य, असे दोन्ही असेल, असे काहीतरी साधन दे.’ हे ऐकून ब्रह्मदेवाने योगसामर्थ्याने चारही वेदांचे स्मरण करून ‘इतिहासासह ‘नाट्यशास्त्र’ नावाच्या नव्या वेदाची निर्मिती केली. त्या वेळी त्याने ‘हा वेद धर्म आणि यश प्राप्त करून देणारा असून उपदेश करणारा, ज्ञानसंग्रहाने युक्त आणि भविष्यात सर्व कर्मांचे दर्शन घडवणारा, असा असेल’, असा व्यापक संकल्प केला.

१ आ. ब्रह्मदेवाने भरतमुनींना नाट्याविषयीचे शिक्षण देऊन नाट्यप्रयोग करण्याची आज्ञा देणे : ब्रह्मदेवाने ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस घेऊन नव्या वेदाची अन् नारीपात्रासाठी अप्सरांची निर्मिती केली. हा वेद सर्व वर्णियांसाठी होता. तेव्हा ब्रह्मदेवाने भरतमुनींना नाट्याविषयीचे शिक्षण देऊन स्वतःच्या पुत्रांसह नाट्यप्रयोग करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर भरतमुनींनी आपल्या १०० पुत्रांना (शिष्यांना) नाट्यशास्त्राचे शिक्षण दिले.

१ इ. नाट्यप्रस्तुतीसाठी ब्रह्मदेवाने देवशिल्पी विश्वकर्मा यांच्याकडून भव्य नाट्यमंडपाची रचना करणे आणि त्या मंडपात भरतमुनींनी ‘अमृतमंथन’ हे पहिले नाटक प्रस्तुत करणे : भरतमुनींनी ‘इंद्रध्वज महोत्सवा’त दैत्यांच्या नाशाचे एक नाट्य प्रस्तुत केले. ते पाहून दैत्यांना राग आला. त्यांनी या नाट्यप्रयोगात विघ्ने आणली. त्या वेळी ब्रह्मदेवाने देवशिल्पी विश्वकर्मा यांच्याकडून भव्य नाट्यमंडपाची रचना केली. असुरांपासून नाट्यमंडपाचे रक्षण करण्यासाठी त्याने विविध देवतांची नियुक्ती केली. ईश्वरी संकल्पाने निर्माण झालेल्या नाट्यमंडपात भरतमुनींनी ‘अमृतमंथन’ हे पहिले नाटक प्रस्तुत केले. त्या वेळी सर्व देवता उपस्थित होत्या. भगवान शिवशंकराच्या आज्ञेने ‘त्रिपुरदाह’ हे दुसरे नाटक प्रस्तुत केले गेले.’

(संदर्भ : भरतमुनीविरचित ‘नाट्यशास्त्र’, अध्याय पहिला, अनुवादक डॉ. संध्या पुरेचा आणि श्रीहरि गोकर्णकर)

अशा प्रकारे धर्माचरणापासून विन्मुख झालेल्या जगाला ब्रह्मदेवाच्या आज्ञेने नाट्यशास्त्राच्या माध्यमातून भरतमुनींनी पुन्हा ईश्वरी साधनेचा मार्ग दाखवला. नाट्यकला (नाट्य, नृत्य आणि संगीत) हे दृक्श्राव्य माध्यम आहे. ‘नाट्यकला हे आध्यात्मिक उद्बोधनासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे’, हे भरतमुनींनी त्या वेळी जाणले होते.

२. कलियुगामध्ये सर्वच कलांच्या शुद्धीकरणाची आवश्यकता जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना साधनेसह विषयांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणे

कलियुगामध्ये नाट्यशास्त्राच्या निर्मितीमागील मूळ दैवी उद्देशाचा लोकांना विसर पडला आहे. त्यामुळे कलेची निर्मिती किंवा प्रस्तुती यांमागील उद्देश ‘आध्यात्मिक उद्बोधन’ हा न रहाता केवळ मनोरंजन हा झाला आहे. कलेला मनोरंजनाचाही पैलू आहेच; पण केवळ तोच मूळ उद्देश असू शकत नाही. त्यामुळे ‘नाट्यकलेसह सर्वच कलांच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जाणले आणि त्यानुसार ते कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. त्यामुळे येणार्‍या युगामध्ये अभ्यासक आणि साधक यांना शुद्ध कलेचे ज्ञान मिळेल. यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण दिसून येते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भरतमुनींच्या संकल्पाची धुरा पुढे नेण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना करून ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ ही शिकवण जागृत करणे

३ अ. कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून सर्व कलांचे मूळ ईश्वरी स्वरूप मांडत असणे : ब्रह्मदेवानंतर कलियुगात केवळ ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, ही शिकवण देत आहेत. ते ईश्वराच्या व्यापक आणि उदात्त संकल्पाची धुरा पुढे नेत आहेत. यातून त्यांचे अवतारत्व लक्षात येते. त्रेतायुगामध्ये ब्रह्मदेवाने विश्वाला आनंदप्राप्तीकडे नेण्यासाठी ‘नाट्यशास्त्र’ या नव्या वेदाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आज कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून सर्व कलांचे मूळ ईश्वरी स्वरूप मांडत आहेत.

३ आ. सर्व कलांचे मूळ ईश्वरी स्वरूप जगासमोर मांडण्याचे कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार होत असणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चा पुढे काही अनुवादकांनी आपल्या सोयीनुसार अर्थ लावला. त्यामुळे योग्य तो अर्थबोध होत नव्हता. संत एकनाथ महाराज यांना संत ज्ञानेश्वरमाऊलींनी दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’चे मूळ स्वरूप मांडून शुद्ध स्वरूपातील ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा जगासमोर ठेवली. त्याचप्रमाणे आज सर्व कलांचे मूळ ईश्वरी स्वरूप विश्वासमोर मांडण्याचे कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे. त्यातून ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ ही शिकवण पुन्हा जागृत होत आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांना कलेच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन घडवणे

साधनेमुळे नाट्याचा सूक्ष्म अर्थ कळतो. ‘स्थुलातून नाट्य कसे असावे ?’, याचे शास्त्र नाट्यशास्त्रातून मांडले आहे. त्याच्याही पुढे जाऊन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक ‘सूक्ष्मातून कलेची अनुभूती कशी घ्यायची ?’, हे अनुभवत आहेत. ते जगाच्या पाठीवर कुठल्याही विद्यापिठात शिकवले गेलेले नाही, उदा. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी संगीताच्या काही परीक्षा दिल्या आहेत. त्या म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने मी स्थुलातील (वैखरीने केलेल्या) गायनाच्याही पुढे जाऊ शकले आणि माझ्या अंतरात सूक्ष्मातील पश्यंती अन् परा वाणीचा अनाहतनाद चालू झाला.’’

५. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’मध्ये ईश्वराच्या कृपेने कला-उपासक साधक घडत असून ते आध्यात्मिक स्तरावरील रसानुभूती घेत असणे

आज समाजामध्ये कलेचे प्रशिक्षण घेऊन अनेक कलाकार त्याचा व्यावहारिक जीवनात लाभ करून घेत असतात. ते त्यांचे उपजीविकेचे साधन असल्याने एका टप्प्यापर्यंत ते योग्यही आहे; परंतु जर कलेच्या प्रशिक्षणाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेची जोड मिळाली, तर नुसता कलाकार घडण्यापेक्षा ‘कला-उपासक’ घडेल. त्यामुळे कलाकारांचा अहं न्यून होईल, तसेच त्यांच्यात या क्षेत्रातील स्पर्धेला आणि अनेक आवाहनांना स्थिरपणे पेलण्याची क्षमता निर्माण होईल. आज ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने मला हे सांगतांना पुष्कळ आनंद होत आहे की, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’मध्ये ईश्वराच्या कृपेने कला-उपासक साधक घडत आहेत आणि ते आध्यात्मिक स्तरावरील रसानुभूती घेत आहेत.

‘श्री गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मला हा विषय सुचला आणि त्यांनीच माझ्याकडून तो लिहून घेतला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञ आहे.’

– सौ. शुभांगी शेळके, एम्.ए. (नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.३.२०२३)