हिंदुत्व रक्षणासाठी जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदे आवश्यक ! – ह.भ.प. गणपत महाराज येसरे

दापोली येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

दापोली, २६ मार्च (वार्ता.) – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जिहाद्यांच्या विरोधात हिंदूंच्या संतप्त भावना पोचवायच्या आहेत. हिंदुत्व रक्षणासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात आणि धर्मांतरबंदी यासाठी कायदा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी केले.

‘हिंदुत्व नष्ट करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदे झालेच पाहिजेत’, या मुख्य मागणीसाठी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केळसकर नाका येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना ह.भ.प. गणपत महाराज येसरे

या आंदोलनाला वारकरी संप्रदाय, भैरवनाथ देवस्थान, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कुणबी विकास मंच, शिंपी समाज, पाटीदार समाज, कुणबी समाज, हिंदु जनजागृती समिती आदींचे प्रतिनिधींसह १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी संघटित व्हा ! – ह.भ.प. बाळकृष्ण बाईत महाराज

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या जमियत-उलेमा-ए-हिंद सारख्या संघटना देश विरोधात कार्य करत आहेत. हिंदूंच्या विरोधात होणारे आघात रोखण्यासाठी संघटित व्हा.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात ! – विनय माळी, मनसे सांस्कृतिक तालुकाप्रमुख

मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. यासाठी हिंदूंनी एका झेंड्याखाली एकत्रित आल्यास जिहादी संकटांचा सामना करता येईल.

शासनाने हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये ! – मनसे उपजिल्हा प्रमुख सचिन गायकवाड

भूमी जिहाद, हलाल जिहाद आणि अन्य जिहादांद्वारे हिंदूंचे शोषण चालू आहे. हलालच्या सर्व उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा. शासनाने हिंदूंच्या सहनशीलतेचा आता अंत पाहू नये.

या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, श्री. परेश गुजराथी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनीही त्यांचे विचार मांडले.