उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून प्रधान सचिवांना अहवाल सादर करण्याची सूचना !
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. याविषयी सर्व सूत्रांचा व्यवस्थित अभ्यास करून अहवाल किंवा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रधान सचिवांना केली आहे.
२५ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. सतीश सोनार यांनी चंद्रकांत पाटील यांची विधीमंडळात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. भाजपचे आमदार श्री. सुनील कांबळे हेही या वेळी उपस्थित होते. संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृत भाषेविषयी अन्य उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. वर्ष २०१३ पासून चालू करण्यात आलेल्या या पुरस्काराद्वारे संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करणार्या ८ मान्यवरांना प्रत्येकी २५ सहस्र रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येते. उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी वर्षभरात १३ हून अधिक उपक्रम राबवून त्यासाठी लाखो रुपये व्यय करण्यात येतात. त्या तुलनेत संस्कृत भाषेसाठी एकच पुरस्कार दिला जातो, तसेच तो चालू झाल्यापासून पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. प्रतिवर्षी संस्कृतदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण करण्याचा शासनाचा आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र पुरस्कार वेळेत दिले जात नाहीत. वर्ष २०२१ आणि २०२२ या वर्षांचेही पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी शाळा, महाविद्यालये यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहित करावे, वेदपाठशाळांना संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही समितीच्या वतीने निवेदनामध्ये करण्यात आली आहे.